चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 22 मे : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. मात्र, फक्त अगदी मोजक्याच उमेदवारांना यामध्ये यश मिळते. त्यात ग्रामीण भाग म्हटला तर सुविधांची वानवा. पण असे असताना जेव्हा एखादा ग्रामीण भागातील, सामान्य गावातील मुलगा जेव्हा या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळवतो, तेव्हा ते फक्त त्याच्या एकट्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असते. असेच यश जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या सामनेर गावातील तरुणाने मिळवले आहे.
कुणाल नाना पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्याची नुकतीच युपीएससी 2023 द्वारे भारतीय वन सेवेत (Indian Forest Service-IFS) निवड झाली आहे. भारतभरातून त्याने 121 वी रँक प्राप्त केली आहे. त्याच्या या यशानंतर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्याची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्याने आपल्या यशाचा आणि तितकाच संघर्षमय प्रवास उलगडला.
सामनेरच्या कुणालची युपीएससीत बाजी –
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील कुणाल नाना पाटील या तरूणाची नुकतीच युपीएससी 2023 द्वारे भारतीय वन सेवेत (Indian Forest Service-IFS) निवड झाली आहे. भारतभरातून त्याने 121 वी रँक प्राप्त केली. कुणालचे दहावीपर्यंचे शिक्षण सामनेर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने जळगावातील मू.जे. कॉलेजमधून पुर्ण केले. यानंतर त्याने नाशिकमधील केके वाघ कॉलेजमधून बीएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तसेच पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला गेला. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पर्यावरण विज्ञान या विषयात मास्टर्स पुर्ण केले. कुणालचे वडील हे माजी सैनिक असून ते सध्या इंडस्ट्रियल कोर्टात वॉचमन आहेत. तर आई गृहिणी आहे. तसेच भाऊ तुषार नाना पाटील हा नाशिक येथे सह्याद्री फार्म्समध्ये व्यवस्थापक तर वहिनी कॅनरा बँकमध्ये शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याचे त्याने सांगितले.
स्पर्धा परिक्षेच्या तयारीस सुरूवात –
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना स्पर्धा परिक्षेच्या तयारीबाबत कुणाल म्हणाला की, सामनेर येथे शिक्षण घेत असताना कुणाल कुमार हे त्यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांविषयी मला जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हापासून मला अधिकारी व्हावे असे वाटायचे. दरम्यान, माझे मास्टर्स पुर्ण झाल्यानंतर 2019 साली दिल्लीत जाऊन स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. पर्यावरण विज्ञान या विषयात मास्टर्स पुर्ण केल्यामुळे वनविभागात काम करायला मिळावे, अशी इच्छा होती.
स्पर्धा परिक्षेतील आव्हाने –
कुणालने आव्हानांबाबत सांगितले की, स्पर्धा परिक्षांची सतत चार-पाच वर्ष तयारी करत असताना अपयश आल्यास आपल्यासह कुटुंबाच्या तसेच समाजाच्या अपेक्षा वाढत जातात. त्यावेळी स्पर्धा परीक्षेत मोठी आव्हाने उभी राहतात. तसेच पुर्व परीक्षा पास करणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी मी जास्तीत जास्त सराव करत ते आव्हान पार केले. यानंतर मुख्य परिक्षेसाठी सुरूवातीला पुरेशी तयारी नसताना देखील त्यासाठी अवघ्या कमी कालवधीत तयारी केली. विशेषतः युपीएससीत मुलाखतीसाठी पहिल्यांदाच पात्र ठरल्याने ते मोठे आव्हान होते. यासाठी मी जास्तीत जास्त मॉक टेस्ट देत मुलाखत दिली.
आयएफसपदी निवड –
कुणालने स्पर्धा परिक्षेची आव्हाने पार करत युपीएससी 2023 साठी पुर्व परिक्षेत 104 गुण मिळवत तो मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरला. यानंतर मुख्य परिक्षेत 649 गुण प्राप्त करत तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. दरम्यान, कुणालने मुलाखतीत 197 गुण मिळवत भारतभरातून 121 रँक मिळवली आणि भारतीय वन सेवेत त्याची निवड झाली.
आयएफसपदी निवड झाल्याची प्रक्रिया –
कुणालने दिल्लीत जाऊन स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केल्यानंतर सुरूवातीला त्याला 3 वर्ष अपयश आले. यानंतर त्याने युपीएससी 2023 साठी स्पर्धा परिक्षेत सतत मिळणाऱ्या अपयशाचे विश्लेषण करत अभ्यासासाठी नव्या पद्धतीने नियोजन केले. कुणालने ज्ञानासह तंत्र विकसित करत त्याच दृष्टीकोनातून अभ्यासाची तयारी केली आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट देत उजळणी केली. सुरूवातीला पुर्व परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 40 चे 45 दिवसांत मुख्य परिक्षेचे नियोजन करत मुख्य परीक्षा दिली. यानंतर महेश भागवत सर (IPS, Telangana) संकल्प इन्टिट्यूट, फोरम आयएएस, इव्हालुएशन यांचे मार्गदर्शन घेत मुलाखतीसाठी तयारी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्यानंतर त्याची आयएफसपदी निवड झालीय.
आयएफसपदी निवड झाल्यानंतरच्या भावना –
आयएफसपदी निवड झाल्यानंतरच्या भावनांबाबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना कुणाल म्हणाला की, युपीएससी 2023 साठी पुर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत दिल्यानंतर निकालाच्या प्रतिक्षेत होतो. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी दुपारची वेळ होती आणि यादीत नाव आल्यानंतर झालेला आनंद हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. गेल्या चार-पाच वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. संपूर्ण कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. माझ्या यशाने वडिलांना मिळालेले समाधान आणि आपला संघर्ष त्यांच्या चेहऱ्यावर दिसणे, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
माझ्या स्पर्धा परिक्षेच्या संपुर्ण प्रवासात अनेक लोकांनी मला मदत केलीय. पण माझे वडील, आई, भाऊ, आणि वहिनी यांनी मला प्रचंड साथ दिली. यामुळे त्यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो. तसेच लहानपणी गावातील शिक्षकांकडून मिळालेल्या शिक्षणामुळे माझ्या यशात त्यांचे देखील योगदान आहे.
कुणालचा तरूणांना महत्वाचा सल्ला –
कुणाल स्पर्धा परिक्षांसंदर्भात तरूणांना मार्गदर्शन करताना म्हणाला की, तरूणांमध्ये प्रचंड क्षमता आहे. पण डिस्ट्रॅक्शन म्हणजे लक्ष विचलित होण्यासही खूप वाव आहे. त्यामुळे तरूण ध्येयाच्या प्राप्तीसाठी ठाम राहत नाही. मात्र, वेळ निघून गेल्यानंतर याची त्यांना जाणीव होते. यामध्ये निर्णय प्रक्रिया फार महत्वाची आहे. आजच्या तरूणांमध्ये सातत्याचा अभाव दिसून येतो. यामुळे स्पर्धा परिक्षा करत असताना सातत्य आणि निर्णय प्रक्रिया या दोन बाबी महत्वाच्या आहेत.
तरूणांनी आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. स्पर्धा परिक्षेतील आव्हाने आणि त्याची प्रक्रिया माहिती असली पाहिजे. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना प्लॅन बी तयार ठेवणे गरजेचे आहे. तरूणांनी परिक्षेसाठी आवश्यक असलेली कठोर मेहनत आणि अभ्यासात सातत्य राखले पाहिजे. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना सतत मिळणाऱ्या अपयशावरून या क्षेत्रातून योग्य वेळी बाहेर पडता यायला पाहिजे. कारण आयुष्यातील उर्जादायी काळ निघून गेल्यानंतर आयुष्य निकामी झाल्यासारखे वाटते, असा महत्त्वाचे अनुभव कथन त्याने यावेळी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना केले.
हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला