मुक्ताईनगर, 25 मे : सध्या जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेने कहर केलाय. गेल्या आठवडाभरापासून 45 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले जात आहे. या तापमानाचा फटका मेंढपाळांना बसला असून मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा शिवारात 90 ते 100 मेंढ्या उष्माघातामुळे दगावल्या आहेत. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान खान्देशात नोंदवले जात आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून या उष्णतेच्या लाटेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसच्या आसपास गेल्याने या वाढत्या तापमानाचा फटका मुक्या जीवांना बसला आहे. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 90 ते 100 मेंढ्या मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट –
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत मेंढपाळांसोबत संवाद साधला. त्यांनी तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आमदार पाटील यांनी सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना व्हिडिओ कॉल द्वारे दिली. शासन व प्रशासन सर्वतोपरी आपल्या सोबत असून हवी ती मदत आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना दिलासा दिल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा कहर –
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान जळगावात असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या कडाक्याचा उन्हाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय. दरम्यान, नागरिकांना उन्हाच्या वेळेत बाहेर पडू नये तसेच उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! अखेर, बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर