अमळनेर, 24 डिसेंबर : उद्या रविवारी 25 डिसेंबरला भारताचे माजी पंतप्रधान दिवगंत अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात अमळनेरच्या तरुणाला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने अॅड. सारांश सोनार हे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये माजी पंतप्रधान दिवगंत अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आपले विचार मांडतील.
देशभरातील 25 तरुणांना कार्यक्रमाचे आयोजन –
नेहरु युवा केंद्राशी संबंधित देशातील 25 तरुणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यात खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर येथील अॅड. सारांश सोनार यांची निवड करण्यात आली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्या 25 डिसेंबरला रविवारी दिल्ली येथे अभिवादन कार्यक्रमात ते आपले विचार हिंदीतून मांडतील.
विमानप्रवास आणि निवासाची सोय –
सारांश यांनी याआधी वक्तृत्त्व स्पर्धांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. त्यांना आता भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालयातर्फे अभिवादन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संसद सचिवालयाच्या वतीने त्यांचा विमानप्रवास आणि वेस्टर्न कोर्ट येथे तीन दिवस निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या या आमंत्रणानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.