जळगाव, 21 जून : जामनेर पोलीस स्टेशनवर केलेल्या दगडफेक प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यापैकी कोणालाही सोडणार नाही, अशी माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केली.
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते काय म्हणाले? –
दगडफेक प्रकरणानंतर पोलीस अधिकारी नखाते यांनी माहिती देताना सांगितले की, बालिकेवर अत्याचार आणि हत्या करण्यात आलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर ही काही समाजकंटकांनी कायदा हातात घेत पोलिसांवर दगडफेक करत तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या घटनेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, अशी माहितीही अशोक नखाते यांनी दिली. आम्ही याप्रकरणात योग्य ती कारवाई करु, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहनही पोलिसांनी जमावाला केले.
जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक –
सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच संतप्त झालेल्या जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. तसेच रबरी टायर जाळून प्रसंगी रास्तारोका सुद्धा केला. त्यामुळे जामनेरात बराचवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिस निरीक्षक किरण शिंदे जखमी –
जमावाकडून झालेल्या तुफान दगडफेकीत जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी रामदास कुंभार, संजय खंडारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत, प्रीतम बर्कले, नीलेश महाजन, सुनील आमोदकर हे देखील जबर जखमी झाले आहेत.
काय आहे संपुर्ण प्रकरण? –
जामनेर तालुक्यात 11 जून रोजी एका सहा वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. सदरच्या घटनेतील संशयित आरोपी सुभाष भील (वय 35, रा.चिंचखेडा) हा घटना उघडकीस आल्यापासूनच फरारच होता. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर, गुरूवारी तो भुसावळ शहरातील तापी नदीच्या परिसरात फिरताना दिसला असता स्थानिक गुन्हे शाखेसह भुसावळच्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले.
हेही वाचा : बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, पाचोरा तालुक्यातील सामनेर गावातील धक्कादायक घटना