जळगाव, 22 जून : राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. कोकणासह मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, खोळंबलेल्या पेरण्यांना आता गती येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यातील काही भागात आतापर्यंत समाधान कारक पाऊस झाल्याने उकाड्यापासून काहीशी मुक्ती मिळाली आहे. जोरदार पाऊस बरसल्याने वातावरणातही गारवा निर्माण झालाय.
विदर्भात मान्सून दाखल –
केरळनंतर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात मान्सून सुमारे दाखल झाल्यानंतर विदर्भात मान्सूनची प्रतिक्षा होती. अखेर, मान्सून नागपुरात दाखल झाला असून नागपूरसह मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस नागपुरसह विदर्भात चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात काय आहे अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात सध्यास्थितीत काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरूवात झाली असून जिल्ह्यात आज आणि उद्या विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तत्पुर्वी, जिल्ह्यात पाच दिवसांपुर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडल्यामुळे पुढील काही दिवस जोरदार पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : दिल्लीवरून परतताच एकनाथ खडसेंनी सांगितले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचे कारण