मुंबई, 23 जून : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, अहमदनगरसह जळगावात बैठका घेतल्या. दरम्यान, जळगावात पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केला गेल्याचा आरोप महायुतीवर केला.
सुषमा अंधारे यांचे खळबळजनक ट्विट –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केला गेल्याचा आरोप करत ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान, कुठाय निवडणूक आयोग? असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केलाय.
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग? @MahavikasAghad3 @ECISVEEP pic.twitter.com/QHT3j0jJIK— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 22, 2024
अंधारे निवडणूक आयोगात तक्रार करणार –
सुषमा अंधारे याबाबत म्हणाल्या की, जळगावात दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ही सभा झाल्यानंतर सभेला उपस्थित असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ मी पोस्ट केला असून सकाळपासून शिंदे गटाचे नेते सांगत आहेत की, असे काही घडले नाही. सभेला उपस्थित असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी हे व्हिडिओ काढले आहेत. याबाबत मी रितसर निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.
शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावला जातोय –
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडीओद्वारे केला. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिलंय. पदवीधर-शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे तसेच निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे. लोकशाहीची हत्या होत आहे आणि निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत आहे, अशी टीका देखील राऊतांनी केलीय.
किशोर दराडेंचा पलटवार –
सुषमा अंधारे यांच्या आरोपावर किशोर दराडे यांनी सांगितले की, मुळातच मला अशा पद्धतीने आरोप करणाऱ्यांची कीव वाटते, हे शिक्षकांचे मतदान असून त्यांच्याकडे कुठलीही मुद्दे नसल्याने चुकीचे खोटे पद्धतीचे आरोप केले जातात. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी किशोर दराडे यांच्यावर बोगस शिक्षक भरतीचा आरोप केला होता. यावर किशोर दराडे यांनी कोल्हेंचा पप्पू म्हणून उल्लेख करत पप्पूला काहीही कळत नाही, अशी खोचक टीका केली.
हेही वाचा : “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला….”; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा