पॅरिस, 28 जुलै : पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलेच कांस्यपदक मिळाले आहे. भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.
मनू भाकरने कांस्य पदक पटकावले –
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय विविध खेळांच्या स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच कालपासून या ऑलिम्पिकच्या स्पर्धेस सुरूवात झालीय. दरम्यान, आज भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक पटकावले आहे. मनू भाकरने पटकावलेले कांस्य पदक हे या ऑलिम्पिकमधले पहिलेच पदक आहे.
नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास –
मनू भाकरने नेमबाजीतील एकूण ऑलिम्पिक पदकासाठी तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली. 2012 मध्ये लंडनच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवटच्या वेळी पदक जिंकले होते. यानंतर नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. मनू भाकर ही 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.
कोण आहे मनू भाकर? –
टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप निराश झाले होते आणि त्यावर मात करायला मला खूप वेळ लागला. खरंतर, आज पदक मिळवल्यानंतर मला काय वाटतंय, हे शब्दात सांगू शकत नाही. दरम्यान, कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होत आणि तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होते, अशा भावना मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. मनू भाकरने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, मनू भाकर ही 22 वर्षांची असून ती मूळची हरियाणा राज्यातील झज्जर तालुक्यातील आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.
राष्ट्रपती-पंतप्रधान यांनी केलं अभिनंदन –
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर राष्ट्रपती-पंतप्रधान यांनी तिचे अभिनंदन केले आहे. 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याने मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन. मनू भाकर नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरलीय. भारताला तुझ्यावर अभिमान आहे, असे द्रौपदी मुर्मु म्हणाल्या. तर नरेंद्र मोदी म्हणाले की, एक ऐतिहासिक पदक. मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केलीय. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचं हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.