जळगाव, 1 सप्टेंबर : पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असताना, त्याठिकाणावरील किनारपट्टीवर घोंघावत असलेल्या ‘असना’ चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता –
सप्टेंबर महिन्याची सुरूवात ही जोरदार पावासाने होणार असून राज्यभरात सर्वत्र 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना आज रविवार (1 सप्टेंबर) रोजी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, आज ढगाळ वातावरण राहणार असून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता –
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण गुजरात किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण व गोव्यात, तसेच विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Video : “मी, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो”, पालघरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, पाहा…