मुंबई, 7 सप्टेंबर : महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, राजकीय, सामाजिक तसेच अभिनय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या निवासस्थानी उत्साहात गणरायाचं आगमन झाले आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान –
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी सुद्धा बाप्पांचे आगमन झाले आहे. राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं, अशी मागणी यावेळी बाप्पा चरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झालाय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक गणरायांची विधिवत पूजा करत गणरायच्या आगमानाचे स्वागत केले.
उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचे घेतले दर्शन –
राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे देखील दिसून येत आहे. भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असताना आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.