जळगाव, 14 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये संपली. तसेच मुदत संपणाऱ्या या 140 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी पार पडली आहे. यानंतर आता या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ब) अन्वये बंधनकारक आहे.
म्हणून सर्व निवडणूक लढविण्यात आलेल्या उमेदवार आणि सरपंच यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी केले आहे. याबाबतचे प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण 140 ग्रामंपचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात सरपंच व सदस्यांच्या एकूण जागा 1348 आहेत. तसेच या निवडणुकीत 431 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. तर या निवडणुकीत 2555 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यानंतर आता ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी 30 दिवसांत खर्चाचा तपशील सादर करावा. खर्चाचा हिशोब देण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी, 2023 आहे, असेही उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी कळविले आहे.