मुंबई, 31 ऑगस्ट : मालिका आणि वेब सिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. प्रिया मराठे ही अवघ्या 38 वर्षांची होती. काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले होते. दरम्यान, मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. आज पहाटेच्या सुमारास तिचं निधन झालं.
प्रिया मराठे हिचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाणे येथे झाला होता. आज 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. अकरावीमध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि अभिनयातच करिअर केले.
अशी झाली अभिनयाची सुरुवात
अभिनेत्री प्रिया मराठे हिने 2005 साली ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
इतकेच नव्हे तर प्रिया मराठे हिने हिंदी मालिकांमध्येही काम केले. ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’ या भूमिकेपासून झाली. पुढे ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती माल्होत्रा’च्या भूमिकांनी तिने घराघरात पोहोचवले.
शंतनू मोघे यांच्याशी विवाह –
प्रिया मराठे यांनी 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी विवाह केला. शंतनू मोघे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान, आता प्रिया मराठे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सिनेसृष्टीतही हळहळ व्यक्त केली जात आहे.