जळगाव – माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणाही त्यांनी केली आहे. मात्र, गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य प्रवेशाला अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत रविवारी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पुष्पा महाजन यांच्या विरोधात काम केले होते. तसेच त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचाच होता तर मग विधानसभा निवडणकीच्या आधी प्रवेश करायला हवा होता. आता अजित पवार गट सत्तेत आल्याने देवकरांचा अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बैठकीला कोण कोण होतं उपस्थित –
दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जळगाव तालुकाध्यक्ष भूषण पवार, नाटेश्वर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेश बंद असल्याचे बॅनरही लागले –
गुलाबराव देवकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत सहभागी व्हावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असून 9 डिसेंबर रोजी ते अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी जाऊन त्यांचे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणार आहेत. यानंतर त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबतची माहिती समोर येणार आहे. मात्र, त्यांच्या या प्रवेशाला स्थानिक पातळीवर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पक्ष आणि पक्ष कार्यालयात देवकर यांना प्रवेश बंद, असे बॅनरही पदाधिकाऱ्यांनी लावले आहे.
पक्षात दोन गट पडल्यावर अजित पवारांसाठी संघर्षाचा काळ होता. मात्र, त्यावेळी देवकरांनी साथ दिली नाही. आता सत्ता आल्याने देवकर पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्या प्रवेशाला विरोध करू, अशी भूमिका पक्षाचे तालुकाध्यक्ष भुषण पवार यांनी मांडली.