जळगाव, 15 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचा वायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. 2 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने वायरमनला अटक केली असून आत्माराम धना लोंढे (वय -57, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर उपविभाग 1 जळगाव एमएसईबी) असे त्याचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी महावितरणचे वायरमन लोंढे यांच्याशी संपर्क साधला होता. नवीन वीज मीटर बसवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता आत्माराम धना लोंढे यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी मागणीनुसार चार हजार रुपये दिले तरीही वीज मीटरचे काम करून देण्यात आले नव्हते.
यानंतर तक्रारदारांनी पुन्हा विचारणा केली असता आरोपीने आणखी दोन हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे सांगत लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी आज, 15 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव पथकाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –
पडताळणीदरम्यान आरोपी वायरमन आत्मराम धना लोंढे याने तक्रारदारांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली व पंचांसमक्ष ती स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.






