जळगाव, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झालीय. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरूवात झालीय. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कोणी-कोणी अर्ज दाखल केलाय ते जाणून घेऊयात.
जळगाव ग्रामीण :
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार गुलाबराव पाटील हे सलग गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताएत. दरम्यान, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काल त्यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून येत्या दोन दिवसांत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पाचोरा-भडगाव :
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील हे गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काल मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रताप हरी पाटील यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांनी अपक्ष देखील कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी आपला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अमळनेर :
अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भुसावळ :
भुसावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान भाजप आमदार संजय सावकारे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी ‘हे’ पुरावे ग्राह्य धरले जाणार