चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यास सुरूवात झाली. दरम्यान, भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसरी उमेदवार यादी जाहीर करत महाराष्ट्रात धक्कातंत्राचा वापर केला. सर्वात महत्वाचे म्हणजे या धक्कातंत्राचे बळी ठरले ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील.
पहिल्याच टर्ममध्ये आमदार अन् पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले उन्मेश पाटील हे एक उच्चशिक्षित, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व अशी त्यांची ओळख बनली. यानंतर आपल्या कार्यकाळात त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करत देशात टॉप-10 खासदारांमध्ये येण्याचा विक्रमही केला. इतकेच नव्हे तर 2019 ते 2022 पर्यंत राज्यातील खासदारांमध्ये सर्वात जास्त निधी खर्च करणारा खासदार, अशी ओळखही त्यांनी निर्माण केली.
पहिल्याच टर्ममध्ये खासदारकी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वाट्याला येईल ती जबाबदारी स्विकारत कार्य केले. मात्र, इतके सगळे असताना भाजपने त्यांचे तिकिट कापले आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालाही धक्का बसला. अर्थात 2019 मध्ये तेव्हाचे महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांचेही विधानसभेचे तिकीट भाजपने कापले होते. त्यामुळे भाजप हा धक्कातंत्राचा वापर करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. याची इतरही अनेक उदाहरणे देता येतील.
दुसरीकडे उन्मेश पाटील यांनी खासदार पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर 2019 ते 2024 च्या कालवधीत मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला, हे प्रामाणिकपणे येथे नमूद करावेसे वाटते. यामध्ये जळगाव विमानतळाचा प्रश्न, उद्योगांसाठी आणलेली गुंतवणूक तसेच गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून लोकांसोबत साधलेला संवाद, इ. ही त्यांनी केलेल्या खासदारपदाच्या कारकिर्दीतील मूलमापनासाठी असलेली कामे.
गिरणा नदी बचावसाठी खासदार उन्मेष पाटील यांनी साधारणतः 300 किलोमीटरची सर्वपक्षीय गिरणा परिक्रमा गेल्याच वर्षी पूर्ण केली. या परिक्रमेत गिरणा काठच्या प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. जळगाव जिल्हा वासियांसाठी गिरणा नदीचे महत्व समजावून सांगत गिरणा नदीतील अमर्याद होणाऱ्या वाळू उपशाला गावकऱ्यांचा विरोध करण्याची भूमिका निर्माण करण्यात खासदार उन्मेश पाटील यशस्वी झाले.
उन्मेष पाटील यांनी पहिल्याच टर्ममध्ये मिळालेले खासदारपद यशस्वीरित्या सांभाळले. मात्र, जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी ज्या चर्चा केल्या जात होत्या, त्या भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीमुळे खऱ्या ठरल्या आणि उन्मेश पाटील यांचे खासदारकीचे तिकिट कापण्यात आले. यानंतर मतदारसंघातील जनतेने कधीही न पाहिलेले उन्मेश पाटील सर्वांना पुर्णपणे माहित झाले ते त्यांच्या निर्णयाने.
भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा आणि प्रबळ पक्ष असताना देखील उन्मेश पाटील यांनी सत्तेला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. एककीडे केंद्रीय यंत्रणाच्या दबावाखाली म्हणा किंवा स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणा, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू असताना एक वेगळ्या वाटेचा स्विकार करण्याचे धाडस त्यांनी केले.
उन्मेश पाटील यांनी सत्ताधारी पक्षाची साथ सोडली अन् मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यानंतर उन्मेष पाटील ठाकरे गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदार असताना देखील त्यांनी ती नाकारली आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटात आलेले त्यांचे मित्र करण पवार यांना ती उमेदवारी मिळवून देण्यात त्यांनी महत्वाचा वाटा उचलला.
ठाकरे गटाच्या पक्षप्रवेशानंतर उन्मेश पाटील यांनी माध्यमांसमोर ठामपणे मांडलेली भूमिका ही लक्षात घेण्यासारखी. आमदार-खासदार पदाच्या कार्यकाळात फक्त आणि फक्त मोदी व विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे उन्मेष पाटील, ठाकरे गटात गेल्यानंतर भाजपात त्यांना मिळालेल्या वागणुकीवर भाष्य करत ‘बदल्याच्या नव्हे तर बदलाच्या राजकारणासाठी मी हा निर्णय घेतोय,’ असे स्पष्ठीकरण त्यांनी दिले.
उन्मेश पाटील यांनी म्हटल्यानुसार, ते जळगावात स्थानिक राजकारणाला कंटाळले होते. पक्षात त्यांना दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे अवहेलना झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुर्जनांचा प्रभाव वाढत असताना सज्जन लोकांचे राजकारणात राहणे महत्वाचे आहे. म्हणून त्यांनी ठाकरे गटात जाणे पसंत केले, असे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेला आव्हान देत नव्या वाटेचा स्विकार करणे त्यांच्यासाठी निश्चितच सोपे नव्हते. मात्र, तरी देखील भाजपसारख्या प्रबळ आणि शक्तीशाली पक्षासमोर त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे, हे निश्चित. या आव्हानांची त्यांना पुरेशा कल्पना असलेच मात्र, तरी देखील ते या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या या निर्णयाची जळगावाचं नव्हे तर राज्याच्या राजकारणातील इतिहासात नोंद झाली. पक्षांतरं ही होत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने विशेष म्हणजे भाजपच्या खासदाराने भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा घेतलेल्या या निर्णयाने जळगाव जिल्ह्यासह राज्याभरात सत्तेला आव्हान देणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली, हे विशेष! आगामी काळात त्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला कसा फायदा होतो, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे.