ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.) पाचोरा, 28 जानेवारी : पाचोरा तालुक्यातून हॉटेल मालकाने राज्य उत्पादन शुल्काच्या दुय्यम निरीक्षकांना मारहाण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक योगेश यशवंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने 26 जानेवारी (शुक्रवार) रोजी पाचोरा-जळगाव रस्त्यावरील आई हॉटेल येथे मद्य मिळून आल्याने हॉटेल मालक ललित विनोद पाटील (रा. पाचोरा) यांचेवर कारवाई केली होती. या कारवाईचा राग हॉटलचे मालक ललित पाटील यांच्या मनात होता.
अधिकाऱ्याला मारहाण –
दरम्यान, भरारी पथक पुढील कारवाईसाठी दुपारी 04.45 वाजता (26 जानेवारी) भरारी पथक हे पुढील कारवाई करण्यासाठी वाडी शेवाळे गावाच्या पुढे ॲक्वा वाटर येथे रोडवर उभे होते. दरम्यान, ललित पाटील हा तेथे आला व त्याने राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक योगेश यशवंत सूर्यवंशी माझ्यावर केलेली कारवाई मागे घ्या, नाहीतर तुम्हाला महागात पडेल अशी दमदाटी करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणला.
याप्रकरणी योगेश यशवंत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ललित विनोद पाटील (रा.पाचोरा) याचे विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गु. र. न.21/2024 भादंवि कलम 353,332 प्रमाणे दि 26/01/2024 रोजी रात्री 09.41 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनी एम. ए. वाघमारे याच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.
हेही वाचा : बालिका अत्याचार प्रकरण, अमळनेर सत्र न्यायालयाने अवघ्या 5 महिन्यातच दिला ‘हा’ महत्त्वाचा निकाल