सोलापूर, 29 जुलै : लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका होत असताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील सरकारवर टीका केलीय. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका. जर राज्यपालांचा तब्बल 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील, असे म्हणत बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. ते सोलापूरात पत्रकारांसोबत बोलत होते.
‘…तर राज्यपालांचा बंगला विका’ –
लाडकी बहिण योजनेवरून बच्चू कडू पुढे म्हणाले की, कष्ट करणाऱ्यांसाठी देखील सरकारने एखादी चांगली योजना जाहीर करायला हवी. राज्य सरकारला एक चांगला सल्ला दिलाय की, मुंबईत राज्यपालांचा बंगला आहे. हा बंगला 40 एकरात आहे. राज्यपालांना 40 एकरचा बंगला कशाला पाहिजे, त्यामुळे राज्यपालांचा तब्बल 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी रूपये मिळतील, असे म्हणत बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला.
‘कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करावी’ –
इतकेच नव्हे तर चार ते पाच मजल्यांचा स्वतंत्र बंगला राज्यपालांना बांधून द्यावा. तसेच राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची 40 एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करावी, असेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा : “तुमचे जर पैसे हवे असतील तर….”, लाडकी बहिण योजनेवरून चाळीसगावात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?