जळगाव, 10 ऑगस्ट : राज्याचा महत्त्वाचा भाग असलेला खान्देश आपल्या वेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. खान्देशात संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे कानबाई उत्सव होय. दरम्यान, खान्देशात आजपासून सर्वत्र मोठ्या संख्येने कानबाई उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवासाठी बाहेरगावी गेलेली कुटुंब एकत्र आली आहेत.
खान्देशाची ग्रामदैवत कानबाई –
कानबाई ही खान्देशाची ग्रामदैवत असून श्रावण महिना सुरु होताच खान्देशात ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सवाची लगबग सुरु होते. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कानुबाईचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवासाठी देश-विदेशात राहत असलेले कुटुंबातील सदस्य न चुकता आपल्या घरी परत येतात, अशी सालाबादाप्रमाणेची परंपरा आहे.
कानबाई उत्सवाची परंपरा –
मराठी वर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी कानबाई उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र, काही भागात दुसऱ्या अथवा चौथ्या रविवारीही कानबाईची प्रतिष्ठापना केली जात असते. कानबाई मातेची स्थापन केल्यानंतर प्रसाद म्हणून केलेले रोट खावे लागतात. यावेळी नोकरी अथवा व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले भावकीतील सदस्य या उत्सवाला मूळ गावी येऊन हजेरी लावतात.
उत्सव अवघ्या दीड दिवसांचा –
कानबाई उत्सव हा अवघ्या दीड दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी कानबाईची विधिवत पूजा करत स्थापना केली जाते. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी गाव-शहरातून वाजत गाजत कानबाई मातेचे विसर्जन केले जाते. गावातील स्त्रिया आपपल्या कानबाईला चौरंगाव बसवून डोक्यावर घेतात. यावेळी गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करत असतात. विसर्जन मिरवणूकवेळी मोठ्या उत्साहाने महिला वर्ग फुगडी खेळताना तसेच भजने गाताना दिसतात. ही मिरवणूक लक्ष वेधणारी असते. वाजत गाजत जाणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीतील भाविक-भक्त तल्लीन झालेले असतात.
भावकीत एकोप निर्माण करणारा सण –
खान्देशात आजपासून कानुबाई उत्सवाला सुरूवात होत असून रविवार विशेष पूजा आणि सोमवारी मातेचे विसर्जन केले जाणार आहे. कानुबाई उत्सवासाठी सर्वांना एकत्र यावे लागत असल्याने हा उत्सव कुटुंब व भावकीत एकोपा निर्माण करणारा देखील उत्सव मानला जातो.