चंढीगड, 29 ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येत आहे. या योजनेच्या धर्तीवर आता भारतामध्ये आणखी एका राज्यातील महिलांना प्रति महिना तब्बल 2100 रुपये दिले जाणार आहेत.
हरियाणा सरकारने महिलांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणा केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, राज्यातील पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेला ‘दीन दयाल लाडो लक्ष्मी योजना’ असे नाव देण्यात आले आहे आणि 25 सप्टेंबर 2025 रोजी दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी ती सुरू केली जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या दिशेने ही योजना एक मोठे पाऊल मानले जात आहे.
मुख्यमंत्री सैनी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांचा समावेश केला जाईल. नंतर हळूहळू इतर कुटुंबातील महिलांचाही त्यात समावेश केला जाईल. या योजनेचा फायदा 23 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना होईल. विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिलांचा त्यात समावेश केला जाईल, परंतु ती महिला गेल्या 15 वर्षांपासून हरियाणाची कायमची रहिवासी असावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, कुटुंबातील पात्र महिलांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा राहणार नाही. जर कुटुंबातील तीन महिला पात्र असतील तर तिघांनाही हा लाभ मिळेल. परंतु जर एखाद्या महिलेला इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत 2100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आधीच मिळत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
याशिवाय, स्टेज-३ आणि स्टेज-४ कर्करोगाने ग्रस्त महिला आणि ५४ दुर्मिळ आजारांनी ग्रस्त महिलांना, जर त्यांना आधीच पेन्शन मिळत असेल, तर त्यांनाही या योजनेचा अतिरिक्त लाभ मिळेल. पहिल्या टप्प्यात सुमारे 19 ते 20 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. पुढील सात दिवसांत या योजनेची राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल आणि त्यासाठी एक मोबाईल अॅप देखील लाँच केले जाणार आहे.