ठाणे, 23 सप्टेंबर : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? –
अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना, त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 3 गोळ्या झाडल्या असल्याची माहिती आहे. एकीकडे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असले तरीही महाराष्ट्र पोलिसांचे मात्र जनेतेने अभिनंदन केले आहे.
अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, आणखी एका गुन्ह्यात अक्षयला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते.
अक्षयला रूग्णालयात मृत घोषित करण्यात आले –
दरम्यान, अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अधिकृतरित्या अद्याप दुजोरा दिला नाही. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अक्षयला रूग्णालयात मृत घोषित करण्यात आलंय. तर पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत