इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : गेल्या अनेक दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रामदेव वाडी अपघातात 4 चार जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील तरुणाचा मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण घटना –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समिर अविनाश सोमवंशी (रा. बाळद बुद्रुक, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. समिर सूर्यवंशी हे आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बाळद येथून पारोळा येथे जात होते. याच दरम्यान, वलवाडी गावाजवळ वळणावर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञाता व्यक्तीने धडक दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मृत समिर सोमवंशी हे पाचोरा तालुक्यातील बाळद येथील सर्वेश मेडीकलचे संचालक होते. परिसरात मेडिकल आणि कृषी केंद्राचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव असल्याने त्यांच्या अपघाती निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : रामदेववाडी अपघात प्रकरणी मोठी अपडेट, तिसऱ्या आरोपीलाही 27 मेर्यंत पोलीस कोठडी