ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजप खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच त्यांच्यासोबत भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे हे देखील ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर अमोल शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले अमोल शिंदे? –
भाजप नेते अमोल शिंदे यांनी ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चावर सांगितले की, मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून माझे नेते संकटमोचक, आदरणीय गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठपणे पक्ष वाढीसाठी माझे काम असेच सुरू राहील. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असल्या अफवांकडे मुळीच लक्ष देऊ नये, असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे.
अमोल शिंदे नेमके आहेत कुठे? –
अमोल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ते श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आले आहेत. तेथून ते पुढे त्यांच्या मुलीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी इंदोर येथे जाणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचलित न होता पक्ष संघटनेचे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा : जळगाव लोकसभा मतदारसंघात येणार ट्विस्ट? ठाकरे गटाची नवी रणनिती