ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रवेश पार पडत आहेत. अशातच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. परेश पाटील, पिंपळगाव येथील माजी सरपंच अशोक पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश केलाय. पाचोऱ्यातील शिवसेना कार्यालयावर हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकी संघ व्हा. चेअरमन नरेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना दीपकसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, गोरख तात्या, शालीग्राम मालकर, अरुण पाटील, रवी गीते, भगवान पाटील, संतोष पाटील, दीपक दादा, प्रविण ब्राह्मणे, वाघ गुरुजी, आर. आर. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचायत समितीसाठी परेश पाटील यांच्या कुटुंबियातून उमेदवारी मिळण्याची शक्यता –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भाजपच्या परेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे काही प्रमाणात बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पिंपळगाव हरेश्वर गण हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेकडून परेश पाटील यांच्या कुटुंबियातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.






