मुंबई, 30 डिसेंबर : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलाय. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बैठकांचे सत्र सुरू होते. तसेच जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नव्हता. अशातच आता युतीच्या चर्चेनंतर जागावाटपाचा हा फॉर्म्युला ठरल्याने युतीतील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष 137 जागांवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 90 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे मुंबई निवडणूक प्रमुख अमित साटम यांनी मंगळवारी भाजप-शिवसेनेच्या युतीतीला जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा केली. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना हा निर्णय झाल्याने तयारीला वेग आला आहे. महायुतीतील इतर छोटे पक्ष शिवसेनेच्या 90 जागांच्या कोट्यातून निवडणूक लढवणार आहेत. आमची चर्चा पूर्ण झाली असून 227 जागांचे गणित मांडण्यात आले असून भाजप 137 आणि शिवसेना 90 जागा लढवेल, असे आमदार साटम यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेसाठी जागावाटप नेमकं कसं? –
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जागावाटप ठरले असून ठाण्यातील 131 जागांपैकी शिवसेना 87 जागांवर तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित 4 जागा मुंब्रा विकास आघाडीला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारांना रात्रीपासूनच अर्ज वाटप सुरू झाले आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस –
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असून, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत असून, शेवटच्या क्षणी उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षांच्या बैठका आणि हालचालींना वेग आला आहे. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर न झाल्यास उमेदवारी रद्द ठरणार असल्याने उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा : Jalgaon News : जळगावात महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम; उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे काही तास






