चाळीसगाव, 29 मे : चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक घटना घडली आहे. गिरणा नदीत आवर्तनाचे पाणी असल्याने पोहायला गेलेला आठ वर्षांचा बालक पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावात ही घटना घडली. यश राजेंद्र पवार (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत एका लहान मुलाला वाचविण्यात यश आले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील गिरणा नदीपात्रात सध्या पाणी आहे. या नदी पात्रात गावातील पाच ते सहा लहान मुले पोहण्यासाठी गेले होते. नदीपात्रात ही मुले गुडघाभर पाण्यात पोहत असताना यश राजेंद्र पवार हा बालक पोहता पोहता थोडा पुढे गेला. दरम्यान, नदीपात्रातील खड्ड्यात गेल्याने पाण्याचा प्रवाहात तो ओढला गेला. त्याचवेळी आणखीन एक मुलगा वाहून जात असताना त्याला दुसऱ्या एका मुलाने धरल्याने तो बचावला.
वरखेडे खुर्द शिवारात सापडला मृतदेह –
यश पवार हा मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. हा प्रकार नदीवर धुणे धुण्यासाठी आलेल्या महिलेने पाहिल्यानंतर तिने गावात पळत जाऊन मुलगा नदीत वाहून गेल्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तत्काळ नदीपात्राकडे धाव घेत मुलाचा शोध घेतला. मात्र, यशचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर वरखेडे खुर्द शिवारात सापडला.
मुलाच्या मृत्यूने आईचा आक्रोश –
गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेला यश पवार हा तिसरीत शिकत होता. यश हा त्याच्या आई- वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. यशचे आई वडील शेतमजूर असून सकाळी ते कामावर जाण्यापूर्वी मुलाला भेटले आणि त्यानंतर अर्ध्या तासात मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, आईला आपल्या बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच तिने एकच हंबरडा फोडत ‘माझा बाळाला आणून द्या हो’ असा आक्रोश केला. दरम्यान, या घटनेने अनेकांचे डोळे पाणावले.
हेही वाचा : धक्कादायक! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण ठार, काय आहे संपुर्ण बातमी?