ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये कारवाई होत असतानाच पाचोऱ्यातून लाचप्रकरण समोर आले आहे. महावितरणच्या सहायक अभियंत्याने सोलर फिटिंग व्यवसायिकाकडे 79 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, एसीबीने सापळा रचत 29 हजार रूपायांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय -38, रा. अभियंता नगर, पाचोरा) यास रंगेहाथ पकडले आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलर फिटिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी तीन प्रकरणांचे कागदपत्र तयार करून ऑनलाईन सादर केले होते. या तिन्ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रति प्रकरण 3 हजार प्रमाणे एकूण 9 हजार रूपये लाच मागण्यात आली होती. तसेच, यापूर्वी काढून दिलेल्या 28 प्रकरणांच्या रिलीज ऑर्डरसाठीही लाच मागण्यात आली होती.
लाच मागितल्याप्रकरणी एसीबीकडे तक्रार –
दरम्यान, तक्रारदार यांनी दिनांक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 11 जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान आरोपी मनोज जगन्नाथ मोरे याने तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे 9 हजार रूपयांची मागणी केली. तसेच यापूर्वी एकूण 28 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे.
दरम्यान, त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून 2 हजार 500 रूपयांप्रमाणे 70 हजार रूपये होतात. त्यापैकी तुम्ही 30 हजार दिले आहेत असे सांगत, उर्वरित 40 हजार पैकी पहिल्या हप्त्याचे आज 20 हजार व चालूच्या 3 प्रकरणांचे 9 हजार अशी एकूण 29 हजार रूपयांची मागणी करून 29 हजार रूपये स्वकारण्याची तयारी दर्शविली.
अन् एसीबीने पकडले रंगेहाथ –
जळगाव लाचलुचपत विभागाने आज 12 जुलै रोजी दुपारी यांच्या महावितरणचे सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे यांच्या कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले. यामध्ये मनोज मोरे यांनी स्वत: लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुध्द भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
जळगाव एसीबीच्या‘या’ पथकाने केली कारवाई –
जळगाव लाचलुचप विभाग प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो.कॉ.राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील आदींनी ही कारवाई केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक-0257-2235477 यावर संपर्क करण्याचे आवाहन जळगाव एसीबीकडून करण्यात आले आहे.