मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा (जळगाव), 7 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोपडा तालुक्यातील अडगाव येथून खूनाची घटना समोर आली होती. मुस्लिम कब्रस्थानजवळ चौघा संशयित तरुणांना ‘गांजा का पित आहेत?’, याचा जाब विचारल्याने एका 45 वर्षीय प्रौढाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून 10 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर दि.31 ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास एक इसम मयत स्थितीत पडलेला आहे, अशी माहिती अडावद गावचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन दिली होती. मयत इसम हा जगदीश फिरंग्या सोलंकी (वय 45, रा. पाटचारी,अडावद ता. चोपडा) येथील असल्याची माहिती मिळाली. मयताच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचेही दिसून येत होते.
अन् अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –
यानंतर मयताचा मुलगा ईश्वर जगदीश सोलंकी (वय 20 रा. पाटचारी, अडावद) याच्या फिर्यादवरुन अज्ञात आरोपीविरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा चौघा संशयित आरोपींची माहिती मिळाली असता मयत जगदीश यांना शेवटचे कोणासोबत पाहिले, त्यांचे लोकेशन याबाबत अभ्यास केल्यावर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, पाटचारी जवळील कब्रस्थान समोर बसुन गांजा पिणारे इरफान अब्दुल तडवी, शहारुख इस्माईल तडवी, शेख मोईन शेख मजिद, कलिंदर रशिद तडवी (सर्वांचे वय 20 ते 25, रा. अडावद) यांनी सदर मयतास ठार मारल्याची माहिती सदर तपासातून उघड झाली.
अन् राग आल्याने केला खून –
मयत जगदीश सोलंकी यांनी मुस्लिम कब्रस्थानाजवळ गांजा पित असलेल्या चौघांना हटकले. यावेळी “तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत”, असे जगदीश सोलंकी बोलले. त्याचा संशयित आरोपी यांना राग आल्याने त्यांनी जगदीश सोलंकी यांच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले. तेव्हा जगदीश हा पळु लागल्याने त्यास कब्रस्थान मधील बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये संशयित घेवुन गेले आणि तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली. तसेच संशयित आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळुन त्यांना ठार मारले. यानंतर मृतदेह उचलुन हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्ग्यासमोर आणून टाकला होता, अशी माहिती संशयित आरोपींकडून पोलिसांना मिळाली.
पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचा केला गौरव –
संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.10 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत. अडावद पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा अत्यंत मेहनतीने केला, असे सांगून पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी तपास पथकाला बक्षीस देऊन गौरविले.
हेही वाचा : धक्कदायक! नाल्याच्या पुलावर खेळत असताना अचानक तोल गेला अन् पाण्यात बुडून दोन सख्या लहान भावांचा मृत्यू