छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीची तिच्या भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज भागात ही ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली. जालना जिल्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच चुलत भावाने डोंगरावरून ढकलून दिले. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटला. मात्र, काही वेळातच ही हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ऋषिकेश शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात अटक केली असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा समावेश आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं –
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या परिचित युवकाच्या प्रेमात पडली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांची समजूत काढली. इतकेच नव्हे तर संबंधित युवकाच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन त्याच्यावर मुलीशी संबंध तोडण्यासाठी दबाव आणला. यासोबतच मुलाच्या कुटुंबीयांनाही याबाबत तशी ताकीद देण्यात आली.
कुटुबीयांनी मुलीलासुद्धा सज्जड दम दिल्यावर मुलगी घर सोडून गेली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. यामुळे घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीने शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर तब्बल 10 ते 15 दिवसांनी ती घरी परतली. त्यावेळी तिची समजूत काढण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज येथे काकांकडे पाठवण्यात आले.
यामुळे अल्पवयीन मुलगी गेल्या 8 दिवसांपासून वाळूज येथील काका तानाजी यांच्याकडे राहण्यास आली होती. काका तानाजी आणि भाऊ ऋषिकेश यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात सोमवारी दुपारच्या सुमारास ऋषिकेशने आपल्या चुलत बहिणीला गोड बोलून खावडा डोंगरावर आणले. तिथं तिच्याशी बोलता-बोलता त्याने तिला 200 फूट डोंगरावरून खाली ढकलून दिले.
सुरुवातीला मुलीने आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी या घटनेसंदर्भात माहिती दिली असता हा खून असल्याचे निष्पन्न झाले. घटना घडली तेव्हा तिथे क्रिकेट खेळत असलेल्या युवकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या माहितीवरुन एम.आय.डी.सी वाळूज पोलिसांनी आरोपी भाऊ ऋषिकेशला ताब्यात घेतले. तर आरोपी ऋषिकेश याआधीही एका प्रकरणात अटकेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता 17 वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांचे पथक करत आहे.
VIDEO : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive