ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक असताना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाचोरा तालुक्यातील जोगे-वडगाव फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून 20 लाख रुपयांची रोकड जमा करण्यात आली आहे. काल रविवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस टाणे हद्दीतील वडगाव जोगे फाटा येथे सर्वेक्षण पथकाकडून नाकाबंदीदरम्यान, वाहन तपासणी चालू होती. यावेळी काल रविवारी वाहनचालक मुझहिद रशीद देशमुख (पाचोरा) याच्याकडे 20 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. यानंतर ही रोकड पाचोरा येथील भरारी पथकाचे प्रमुख राजेश बन्सीलाल राठोड यांना बोलावून पुढील कारवाई करण्यात आली.
15 दिवसांतील चौथी कारवाई –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वच ठिकाणी भरारी पथकाच्या वतीने नाकाबंदीदरम्यान, वाहनांची तपासणी केली जात आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातही वाहनांची तपासणी केली जात आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हेदेखील कर्मचाऱ्यांसोबत दररोज रात्री जोगे-वडगाव फाटा येथे तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत आहेत. यातच आता काल पाचोरा तालुक्यातील जोगे-वडगाव फाटा येथे 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मागील 15 दिवसांतील ही चौथी कारवाई आहे.
या पथकाने केली ही कारवाई –
दरम्यान, कालची ही कारवाई स्थिर पथकातील जोगे-वडगाव येथील पोलीस कर्मचारी मुकेश तडवी, मनोज बडगुजर, पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक –
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी आता प्रचाराचा आज शेवटचा दिसून असून प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 5 नोव्हेंबरपासून राजकीय प्रचाराचा धुरळा उडाला होता. यानंतर आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार? कजगाव येथील जनतेशी थेट संवाद