जळगाव : संपूर्ण भारतात तसेच परदेशातही जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. याच भारत सरकारने फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रम घेतला. यामध्ये जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आणि यासाठी मेगा क्लस्टर म्हणजे जवळपास 100 कोटीचा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने जळगाव जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या केळी क्लस्टर अंतर्गत केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढविण्यासाठी कोल्ड स्टोरेज व वेअर हाऊस उभारणीसाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळणार आहे.
लोकप्रतिनिधींची पाठपुरावा –
केंद्र सरकारने जळगाव जिल्ह्यात केळी शेतीत क्रांती घडवून आणण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या मेगा क्लस्टर विकास प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्याच्या केळी उत्पादकांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल जावळे, चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, अमोल पाटील यांचे सहकार्य मिळाले.
तर जिल्ह्यासाठी केळी विकास महामंडळाची संकल्पना, यासोबतच प्रस्तावित असलेल्या केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज आणि वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्याचा विचारही सरकार करत आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा व मुक्ताईनगर यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन केले जाते. या उद्देशअंतर्गत मोठ्या प्रमाणात केळी पुरवली जाते. यासाठीच बनाना क्लस्टर प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे.
पायाभूत सुविधांना चालना : योजनांमध्ये कोल्ड स्टोरेज सुविधा, राईपनिंग चेंबर्स आणि केळीची गुणवत्ता आणि शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करणे समाविष्ट आहे.
निर्यात विस्तार : भुसावळ ते मुंबईच्या जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेमार्गे केळीची वाहतूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे वाहतूक खर्चात 50% कपात होईल आणि निर्यात अधिक स्पर्धात्मक होईल.
सेंद्रिय शेती : सेंद्रिय उत्पादनाची जागतिक मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना तज्ञ प्रशिक्षण मिळेल.
प्रक्रिया सुविधा : केळी प्रक्रिया युनिट उभारणे, उत्पादनाचे मूल्य वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे यावरही प्रकल्पाचा भर असेल. हा उपक्रम केळी उत्पादन आणि निर्यातीसाठी जळगावला एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान देईल. यामुळे स्थानिक शेतकरी आणि व्यापक अर्थव्यवस्थेचा फायदा होईल.