पणजी, 19 ऑगस्ट : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि चेस अॅडव्हायझर्सच्या सहकार्याने ‘गोवा@2037 ची पुनर्कल्पना या संकल्पनेअंतर्गत पर्यटनक्षेत्राला शाश्वत आणि डिजिटली कनेक्टेड करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पणजी येथील हॉटेल विवांतामध्ये पार पडला.
या बैठकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या प्रतिमा धोंड, वाहतूक संचालक तसेच गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हा संकल्प ठेवला आहे. मात्र, गोवा हेच उद्दिष्ट 10 वर्षे आधी म्हणजे 2037 पर्यंत पूर्ण करेल. गोवा हे देशातील एक प्रमुख पर्यटन राज्य असून दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक गोव्यात येतात. ही नाळ ओळखून गोवा सरकार केवळ वाहतूक क्षेत्रातच नाही तर आता सर्वच क्षेत्रात डिजिटल होऊ इच्छित आहे.
गोवा सरकारने डिजिटल प्रणालीद्वारे आतापर्यंत गोव्यात एआय-आधारित 240 हून अधिक सेवा डिजिटल केल्या आहेत. यामुळे व्यवहारामध्ये सहजता आली असून आणखी काही सेवा डिजीटल होणार आहेत. त्यामुळेच राज्याची पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होणार आहे. विकसीत गोव्यासाठी 90 टक्के इन्फ्रास्ट्रक्चर तयार असून याकामी राज्यातील सुमारे 70 टक्के लोक कार्यरत आहेत.