मुंबई, 2 डिसेंबर : राज्यातील नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. तर या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल उद्या 2 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते. मात्र, आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे आता उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पडल्यानंतरच एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
निकालाची तारीख कोर्टाने पुढे ढकलली –
राज्य निवडणूक आयोगाकडून 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या नियोजित वेळापत्रकानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे आणि उद्या या सर्व ठिकाणी निकाल जाहीर होणार होते. पंरतु, कोर्टाने निकालाची तारीख 21 डिसेंबरपर्यंत ढकलल्याने सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांचा भ्रमनिरास झालाय.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी –
न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 25-30 वर्षांपासून मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण, पहिल्यांदाच पाहतोय की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे जात आहेत आणि त्याचे निकाल देखील पुढे जात आहेत. मला असं वाटतं की, 284 पैकी केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत. म्हणूनस सगळी मतमोजणी पुढे करणे एकूणच ही पद्धती फार योग्य नाहीये.
दरम्यान, उच्च न्यायलय खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. तसेच निवडणूक आयोग स्वायत्त आहे. जे उमेदवार आहेत मेहनत करतात आणि प्रचार करतात, त्यांचा भ्रमनिरास होतो, यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणे योग्य नसल्याची नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.
निवडणुकांचा पुरता खेळखंडोबा झाला आहे – विजय वडेट्टीवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवलाय. वडेट्टीवार याबाबत म्हणाले की, निवडणुकांचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. निवडणुका म्हणजे पोरखेळ झाला असून राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे.
सुप्रीम न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि ओबीसीला 27 टक्के आरक्षण दिले, हे सरकारला दाखवायचे होते. दरम्यान, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी 21 डिसेंबरला गेली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
गिरीश महाजन यांचा विरोधकांना टोला –
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, आता निकालाची वीस दिवस वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकांबाबत असा गोंधळ कधीही राज्यात झालेला नव्हता. कालपर्यंत, अनेक नगरपालिका निवडणुका रद्द झाल्या. काही प्रभागांच्या निवडणुका देखील रद्द झाल्या आणि हे सर्व पहिल्यांदाच होत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे मात्र विरोधकांना पुन्हा संधी मिळाली असून 18 दिवसात यांनी पेट्या बदलल्या, असा आरडाओरडा विरोधक करतील. मात्र, विरोधकांनी आता या पेट्यांजवळ खाट टाकून झोपावे आणि एक मिनिटही पेट्यांपासून बाजूला जाऊ नका, नाहीतर पुन्हा आमच्या नावाने शंखनाद सुरू करतील, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावलाय.






