मुंबई, 20 एप्रिल : राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी साद घातल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात राज ठाकरेंसोबतच्या युती सकारात्मक प्रतिसाद दिला. यावरून राज्यात ठाकरे बंधुंच्या युतीबाबत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया केल्या जात आहेत मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे बंधुंच्या युतीबाबत विचारले असता ते पत्रकारावर भडकले.
एकनाथ शिंदे पत्रकारावर भडकले –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी अर्थात दरे याठिकाणी गेले आहेत अमरावती विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते मुंबईत पोहचले आणि त्याठिकाणाहून ते थेट त्यांच्या दरेगावी गेले. याठिकाणी ते शेतीमध्ये रमल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात आता राज्यात ठाकरे बंधुंच्या युतीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत आणि याबाबतच एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराने एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते भडकले. ‘अरे जाऊदे यार..काय तू कामाचं बोल यार…’, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी संताप व्यक्त केला.
ठाकरे बंधुंच्या युतीबाबत प्रतिक्रिया –
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत घातलेल्या साद-प्रतिसादानंतर त्यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अजित पवारांपर्यंत तसेच विरोधी पक्षातील नेत्यांपासून गाव खेड्यांपर्यंत ठाकरे बंधुंच्या युतीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अशातच अनेकांनी त्यांच्या युतीचं स्वागत केले असून ते ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच होईल, अशा स्वरूपातही भावना व्यक्त केल्या जात आहेत.