चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 24 मे : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिय पार पडत असताना राज्यातील मतदानासाठीचे पाचही टप्पे पुर्ण झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक सुरू असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी –
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहित राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी केली आहे. पीडित आणि सरकारी सुविधांसाठी झगडणाऱ्या लोकांना मदत करता यावी, यासाठी मुख्य सचिवांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.
सरकारकडून मदत देण्यास अडचणी –
राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सरकारला शक्य नसल्याचे कारण पत्रात नमूद करण्यात आले आहे. आचारसंहितेमुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळत नाही. याशिवाय पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे देखील शक्य होत नाही. आचारसंहितेमुळे महानगरपालिका आणि महानगरपालिकांच्या कामावर परिणाम होत असल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेत महाराष्ट्राला दिलासा द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने केली आहे.
आचारसंहिता केव्हा निघणार? –
आचारसंहितेच्या नियमानुसार, देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होते. तसेच नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागल्यानंतर 8 ते 10 दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केलेल्या मागणीवरून महाराष्ट्रात आचारसंहितेत शिथिलता येणार का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी