पाचोरा, 22 फेब्रुवारी : सुवर्ण खान्देश चॅनेलने फक्त बातम्या देण्याचे काम केले नाही तर लोकशाही मजबूत करण्याचेही काम केले, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला येण्याची जिल्हाधिकारी महोदयांची खूप इच्छा होती आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. पण काही प्रशासकीय कामामुळे याठिकाणी जिल्हाधिकारी महोदय उपस्थित राहू शकले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक स्वप्नील येवले उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासोबतच इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
काय म्हणाले उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड? –
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यावेळी म्हणाले की, या कार्यक्रमाला येण्याची जिल्हाधिकारी महोदयांची खूप इच्छा होती आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. पण काही प्रशासकीय कामामुळे याठिकाणी जिल्हाधिकारी महोदय उपस्थित राहू शकले नाहीत आणि सरांनी मला याठिकाणी सांगितलं होतं की, आपण याठिकाणी जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे मला याठिकाणी आपल्यासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली.
सुवर्ण खान्देश मागच्या 2 वर्षात एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल म्हणून उभे राहिले आहे. केवळ बातम्या देण्याचं काम नाही तर त्यांनी तळागाळातील समस्या, विकासाच्या दिशा, प्रशासनाचे वेगवेगळे उपक्रम, शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणव्याचे काम त्यांनी याठिकाणी केले. राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांचे प्रश्न वेगळे असतात. परंतु आपल्या स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरीलच न्यूज चॅनेल असणे किती आवश्यक आहे, हे आज आपल्यासमोर सुवर्ण खान्देशने दोन वर्षात केलेल्या कामगिरीवरुन दिसून आलेले आहे.
आज पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात माध्यमे आहेत. सोशल मीडियाचाही स्फोट झाला आहे. पण विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा सखोल अभ्यास करून ती बातमी प्रकाशित करणे, हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. आजच्या काळात ट्रायल मीडिया नावाची संकल्पनाही पाहायला मिळते. पण वस्तुस्थिती आणि समस्या, त्याचं मूळ काय आहे, हे पाहून बातमी देणे अपेक्षित आहे. जनतेच्या मनात आपल्या हक्कांविषयी जाणीव निर्माण करणं ही प्रसारमाध्यमांची भूमिका आहे.
आज 25 टक्के नागरिक हे निरक्षर आहेत. त्यांना आपल्या हक्काची जाणीव नसते. शासनाच्या विविध योजना असतील, नागरिकांच्या हक्कांची महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य या प्रसारमाध्यमांद्वारे केलेले आहे. आता मी चित्रफित पाहत असताना मागच्या 2 वर्षात सुवर्ण खान्देशने जी कामगिरी केलेली आहे, ती खरंच खूप समाधानकारक आहे. आपल्या ग्रामीण भागात एखादे न्यूज चॅनेल ओपन होणे आणि ती यशस्वीरित्या 2 वर्षे पूर्ण करणे, याला ग्रामीण भागात, स्पर्धेच्या युगात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आज अनेक जण व्ह्यूजच्या मागे धावतात. पण बोटावर मोजण्या इतकेच चॅनेल्स ही वस्तूस्थिती विचारात घेऊन बातमीच्या मुळापर्यंत जाऊन त्याठिकाणी बातमी प्रकाशित करतात. त्यातील एक चॅनेल म्हणजे सुवर्ण खान्देश हे चॅनेल आहे.
आज संशोधनावर आधारित पत्रकारितेची खूप गरज आहे. घडलेल्या घटनेची माहिती देणे. हा पत्रकारितेचा हेतू नाही तर त्या घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणणे हे महत्त्वाचे आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील समस्या या वेगळ्या असतात. त्यांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यात पाणीटंचाई, रस्त्याच्या समस्या, शेतमालाचे दर, बेरोजगारी, शिक्षणाच्या संधी यांसारखे प्रश्न याठिकाणी बातमीच्या रुपाने प्रकाशित केले तर आपण समाजात जागरूकता निर्माण करू शकतो.
आता आर्टिफिशिअल इंजेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर पत्रकारितेत पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान हे केवळ सोयीसाठी नाही. तर ते समाजाच्या प्रगतीसाठी पण असायला हवे. आधी बातम्यांचं सकलंन करायला वेळ लागायचा. मात्र, आता एआयच्या माध्यमातून कमी कालावधीत माहितीचं विश्लेषण जमा करू शकतो. ग्रामीण भागातील वाचक हे यांना जर काही भाषा सोडल्या, तर बाहेरच्या ज्या बातम्या आहेत त्या वाचणं सहज शक्य होत नाही. एआयच्या माध्यमातून हे भाषांतर वाचकाला शक्य होतं.
पत्रकारितेत नव्या संधी आणि धोकेसुद्धा आहेत. डिजिटल पत्रकारितेत आव्हानेही मोठी आहेत. त्यामध्ये सायबर हल्ले असतील, खोट्या माहितीचा प्रसार असेल किंवा डाटा चोरी यासारख्या समस्या भेडसावत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांइतकेच स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे महत्त्वाचे आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे सुवर्ण खान्देश चॅनेलने याठिकाणी फक्त बातम्या देण्याचे काम केले नाही. तर लोकशाही मजबूत करण्याचेही काम केले आहे, या शब्दात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. निवृत्ती गायकवाड यांनी यावेळी क्षेत्रीय न्यूज चॅनेलचे महत्त्व व आधुनिक पत्रकारितेची भूमिका यावर त्यांनी भाष्य केले. तसेच सुवर्ण खान्देश न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांचा सत्कार सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने यांनी केला.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले. यावेळी सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांचा लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, पाचोरा पत्रकार संघाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या पाचोरा टीमच्या वतीने, कल्पेश टीचे जगन्नाथ महाजन, एसएसआर ट्रेडर्सचे रकीब देशमुख सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.