मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वेळी म्हणजे 2019 मध्ये भाजपने महाराष्ट्रात 23 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने 48 पैकी फक्त 9 जागा जिंकल्या. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. हा जो भाजपला धक्का महाराष्ट्रात सहन करावा लागला याची संपूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी स्विकारत आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे की, आता मला विधानसभेसाठी पूर्ण वेळ तयारी करायची आहे. त्यामुळे मी भाजपच्या हायकमांडला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले –
महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रात आम्हाला मिळाल्या. खरं म्हणजे आमची लढाई ही महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती तशीच ती नॅरेटिव्हसोबतही होती. यामध्ये संविधान बदलणार असा जो प्रचार करण्यात आला, तो निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवता यायला हवा होता, तो आम्ही थांबवू शकलो नाही, हेदेखील खरं आहे. जनतेने जो जनादेश आहे, तो शिरसावंद मानून पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो.
पराभवाची जबाबदारी माझी –
काही ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्याप्रकारे सरकारने आरक्षण दिल्यावरही एक नरेटिव्ह तयार केला गेला, त्याचं इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही. त्या विशेष फटका आम्हाला मराठवाड्यात बसला. कितीही आकडेवारी मांडली तरी जागा कमी मिळाल्या आहेत, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्त्व भारतीय जनता पक्षात मी करत होतो त्यामुळे याठिकाणी जो काही पराभव झाला, याची जबाबदारी माझी आहे ती मी स्विकारतो. मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी याच्यामध्ये कमी पडलो आणि ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे मी करणार आहे.
मला सरकारमधून मोकळं करावं –
हा जो भाजपला धक्का महाराष्ट्रात सहन करावा लागला याची संपूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी स्विकारत आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे की, आता मला विधानसभेसाठी पूर्ण वेळ तयारी करायची आहे. त्यामुळे मी भाजपच्या हायकमांडला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, जेणेकरुन ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे, ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणार आहे. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने, ते जे सांगतील ती कारवाई मी करेन, असे ते म्हणाले.
एनडीएचे सरकार तयार होत आहे –
पंडित नेहरूंनंतर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान बनण्याचा आशिर्वाद हा मोदीजींना जनतेने दिला आणि भारतात एनडीएचे सरकार बनतंय. हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे मी देशभरातील एनडीए कार्यकर्ते आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो. जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या आघाडीला जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जागा या एकट्या भाजपला देशात मिळाल्या. त्यामुळे सर्व लोकांनी एकत्र येऊन जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील भाजप त्यांच्यापेक्षा मोठी राहिली. भाजप आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून एनडीएचे सरकार तयार होत आहे, असे ते म्हणाले.