जळगाव, 21 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काय म्हणाले मंत्री धनंजय मुंडे –
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील 27 महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी दिले.
गुगल मॅपिंगचा डाटा घ्या –
तसेच जळगाव मधील 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी, असे आदेशही मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारने मदत करावी, अशी मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढल्याने पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली होती मागणी –
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.
मंत्रालयातील बैठकीत दिले आदेश –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या पत्रनुसार कृषीमंत्री धनजंय मुडे यांनी मुबंईत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील आदी उपस्थित होते.