जळगाव, 27 जून : जर जमिनीमध्ये एकनाथ खडसेंनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसेंवर केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर संदर्भात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, खडसेंना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितलं, त्यानुसार ते वागत आहेत. जर जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती? ते परिवारात राहिले असते. नवीन मालकाकडे थोडी जावं लागलं असतं.
त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारी आम्ही लोकं नाहीत. आम्ही जनतेचे लोकं आहोत. जनतेकरता काम करतो आहोत. जनतेला फायदा देण्याकरता याठिकाणी आलो आहोत, अशी प्रतिक्रिया देत जळगावची जनता आमच्या सोबत आहे, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, एकेकाळी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे एकनाथ खडसेंवर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला होता. यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सातत्याने ते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत आहेत. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर विधानपरिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.