नाशिक, 4 फेब्रुवारी : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच व्यवहारीक ज्ञान व विविध कौशल्ये अवगत असली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवावेत, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या परिक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवाविण्यासाठी सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी, असे आदेश मंत्री दादा भूसे यांनी दिले. गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलेत होते.
मंत्री दादा भुसे काय म्हणाले? –
मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की, सर्व विभागातील शाळांचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. यासोबत मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह असावीत. शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ही शहरात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांना देण्यात येणार आहे. मुलांना शाळेत देण्यात येणारा आहाराचा दर्जा उत्तम असावा. सर्व माध्यमाच्या शाळांनी राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायले गेले पाहिजे. यासोबतच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिर्वाय आहे व तो शिकविला गेला पाहिजे याची प्रभावी अमंलबजावणी व्हावी. मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ज्या शाळांना संरक्षक भिंत नाही त्यांनी नरेगाच्या माध्यमातून करून घ्यावी. शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळांना भेटी द्याव्यात व भेटीद्वारे शाळांची गुणवत्ता तपासणीसोबतच त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबी व अडचणी दूर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी दिल्या.कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासाठी सूचना –
ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात इतर विभागांचे अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. त्यादृष्टीन विभागातील सर्व शाळांनी मुलांचे अध्ययन व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करावेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये स्थलांतरामुळे अडचणी निर्माण होतात. या कामागारांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये व त्यांचे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. विभागात आगामी काळात होणाऱ्या परिक्षांसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवाविण्यासाठी सर्व शाळांनी आवश्यक तयारी करावी.
दरम्यान, शाळांमध्ये आवश्यक सेवासुविधा व भौतिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची उपलब्धता होवू शकते. यासह लोकसहभाग, जिल्हा परिषद सेस निधी, क्रिडा विभाग, सेवाभावी संस्था, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, जिल्हा पातळीवरील मोठे उद्योग यांच्या सीएसआर निधीतून ही कामे करणेही शक्य असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच केली जाणार –
येणाऱ्या काळात तालुका पातळीवर एक आदर्श शाळा तयार करायची आहे. या शाळांमध्ये वाचनालय, लॅब, क्रीडा साहित्य, डिजिटल सुविधा असणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनधींशी आवश्यक बाबींची चर्चा करून तसा आराखडा तयार करावा. 200 पटसंख्या वरील शाळांमध्ये एक स्मार्ट क्लासरूम तयार करणार असून त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये सर्व प्रकारच्या अद्ययावत व डिजीटल शिक्षणाच्या सुविधा असतील. आठवड्यातील प्रत्येक दिवस इयत्तेनुसार या क्लासरूमचा अनुभव घेता येईल. शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेण्यात यावी. सर्व अधिकारी व शिक्षकांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशाही सूचना शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी दिल्या.
यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री ई-उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक पुष्पा पाटील यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी ई-उपस्थित तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण योजनेचे प्राचार्य व आदर्श शिक्षक हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
हेही पाहा : Video : विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा तरुणाईला काय सल्ला?