जालना, 2 एप्रिल: जालन्यात समृद्धी महामार्गावर मोठा अपघाताची घटना घडली असून या अपघातात आठ कामगार महिलांचा मृत्यू झाला. तर 8 ते 10 गंभीर जखमी असून मृत आणि जखमी हे सर्व समृद्धी महामार्गावर स्वच्छतेचे काम करणारे मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामगारांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकपला भरधाव ट्रकने उडवल्याने हा दुर्दैवी अपघात झाला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातबाबत शोक व्यक्त करत मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
भीषण अपघातात 8 महिला कामगारांचा मृत्यू –
जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. समृद्धी महामार्गावरील स्वच्छता कामासाठी जाणाऱ्या कामगारांच्या महिंद्रा पिकअप वाहनाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत आठ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पळून जाण्याच्या तयारीत असलेला वाहन चालक प्रकाश राजवर (25, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याला लोकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
अलकाबाई दादाराव आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), मीना परमेश्वर आदमाने (४४), सुमनबाई कचरू आदमाने (७०) (सर्व रा. निधोना, ता. जालना), ताराबाई गहिनाजी चौधरी (४५), कडूबाई रामदास मदन (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (४५) (तिघी रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर), मंगलबाई प्रकाश शिनगारे (५५, रा. खादगाव) अशा आठ महिलांचा यात मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर –
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जालना प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून जखमींना त्वरित उपचार देण्याच्या सूचना दिल्या. याबाबत त्यांनी म्हटलंय की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.






