चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पूत्र आणि चेवेनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांनी फक्त बुलढाणाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मनाचा तूरा रोवला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे सुपूत्र राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
काय आहे जर्मन चॅन्सलर फेलोशिप –
जर्मन चॅन्सलर फेलोशिप ही जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त आलेक्सांडर हुंबोल्ट फाऊंडेशन द्वारे दिली जाते. 1953 पासून कार्यरत असलेल्या या जगप्रसिद्ध फाऊंडेशनचे फेलो अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग शिवाय 61 विविध क्षेत्रातील नोबेल विजेते राहिलेले आहेत. त्यामुळेचं विदर्भातील भटक्या समाजातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांची या प्रतिष्ठित फेलोशीपसाठीची निवड देशासाठी व महाराष्ट्रासाठी विशेष गोष्ट आहे.
राजू केंद्रे जर्मन चॅन्सलर फेलोशिपच्या माध्यमातून जर्मनी व भारतातील उच्च शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास, उच्च शिक्षणातील असमानता व त्यावरचे धोरणात्मक बदल ह्या विषयात त्यांचे संशोधन आणि कार्य असणार आहे. या माध्यमातून ते जर्मनी सोबतच युरोपातील विद्यापीठे प्रत्यक्षपणे समजून घेणार आहेत. तेथील धोरणे, संशोधन क्षेत्र व वंचित समुदायाचा मुख्य प्रवाहात समावेष, हा अभ्यास भविष्यकाळात भारतातील शिक्षण क्षेत्रात व वंचित समुदायांसाठी महत्वाचा ठरणारा असेल. फेलोशिपच्या माध्यमातून ते दीड वर्ष जर्मनीमध्ये बोन, बर्लिन शहरात व युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगन विद्यापीठात मॉडर्न इंडिया सेंटरसोबत काम करणार आहेत.
राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे ह्या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. अवघ्या 9 आणि 9 वयात लग्न केलेल्या आई वडिलांना त्यांचे प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण करता आले नाही. पण त्यांनी राजुला तेव्हढ्याचं जिद्दीने शिकवले म्हणून ते आज इथपर्यंत पोहचले आहेत. राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेले आहे.
2011 मध्ये बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले, पण सामाजिक व आर्थिक अडचणींमुळे अवघ्या सहा महिन्यात त्यांला पुणे सोडावे लागले. पुणे सोडल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करावं लागलं. मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना दोन वर्षे सातपुडा भागातील मेळघाट आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आजही उच्च शिक्षणापासून लाखो विद्यार्थी वंचित आहेत म्हणून हाच प्रश्न घेऊन त्यांने पुढे एकलव्य इंडिया फाऊंडेशनची स्थापना केली.
राजु केंद्रे यांचे म्हणणे आहे की, मी जे उच्च शिक्षण घेताना भोगलं आहे ते माझ्या बाकीच्या वंचित घटकातील समाजातील विद्यार्थ्यांनी भोगायला लागू नये, त्यांचा हा संघर्ष कमी व्हावा म्हणून 2017 मध्ये एकलव्य फाऊंडेशनची स्थापना केली आहे. एकलव्यच्या माध्यमातून आतापर्यंत भारतभरातील अनेक विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे.
राजु यांना 2022 मध्ये ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित ‘चेवनिंग स्कॉलरशिप’ मिळाली होती. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केले आहे. तिथे त्यांनी उच्च शिक्षण व असमानता या विषयावर संशोधन केले आहे. राजू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशोका फेलोशिप, स्वीडिश इन्स्टिटयूट, इनलॅक्स, चेवनिंग स्कॉलरशिप, टेड टॉक, रॉयल सोसायटी यांसारख्या जगमान्य संस्थांची सुद्धा फेलोशिप त्यांच्या कार्यासाठी व संशोधनासाठी मिळाली आहे. 2022 मध्ये प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांना 30 प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केलं होते.
सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना काय म्हणाले राज केंद्रे?
“आलेक्सांदर हुंबोल्ट फाऊंडेशन सारख्या युरोपातील महत्वाच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग आपल्या देशासाठी, राज्यासाठी व विशेषतः उपेक्षित घटकांसाठी कसा उपयोग करता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील असेल. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात वारसा असलेल्या रयत, शिवाजी, पीपल्स सारख्या ऐतिहासिक सामाजिक वारसा असलेल्या शिक्षण संस्थाच्या कामाचा आदर्श घेऊन व जगाच्या समकालीन शिक्षण देणाऱ्या जागतिक संस्थांची प्रेरणा घेऊन भविष्यात भारतात वंचित समुदायासाठी संस्थात्मक बांधणीचे काम करण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी जर्मन चॅन्सलर फेलोशिप व आलेक्सांडर हुंबोल्ट फाऊंडेशन नक्कीच एक महत्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना दिली.
एकलव्यच्या सात वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा:
- महाराष्ट्र आणि भारतभरातील आदिवासी, भटक्या विमुक्त, दलित वंचित घटकातील पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठीचे भरीव काम.
- विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीसाठी भारतात आणि जगभरात प्रवेश आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी एकलव्यने एक वर्षभराचा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे.
- 2 लाख विद्यार्थ्यांना करियर सेमिनार्स द्वारे आतापर्यंत मागर्दर्शन केले आहे.
- 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी भारत आणि जगभरातील विद्यापीठात दाखल झाले आहेत.
- एकलव्य ग्लोबल स्कॉलर्सच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
- एकलव्यकडे 400 हून अधिक वेगवगळ्या क्षेत्रातील देश आणि विदेश पातळीवरील मेंटॉर्सची नेटवर्क आहे.
- विद्यार्थ्यांना 40 कोटीची स्कॉलरशीप भारतातील आणि जगभरातील शासकीय आणि निमशासकीय माध्यमातून मिळाली.
- भारतातील 25 पेक्षा जास्त राज्यातील विद्यार्थ्यांना एकलव्यच्या उपक्रमांत सहभाग आहे.