जळगाव, 30 डिसेंबर : राज्यभरात यंदा काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, निसर्गाच्या या लहरीपणामुळे कापूस उत्पादनात घट झाली असताना कापसाचे भाव देखील हमीभावापेक्षा कमी झाले आहेत.
कापूस उत्पादक शेतकरी हतबल? –
सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. सध्या कापसाचे दर खासगी बाजारात देखील 6500 ते 6800 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जिनींगसह सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे.
कापूसाला भाव मिळणार का? –
दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनांत प्रचंड घट आली आहे. शेतकऱ्यांनीही आता भाव वाढीपर्यंत कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. सध्यास्थितीत खासगी बाजारात देखील कापसाला योग्य दर नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ‘आमच्या कापसाला योग्य भाव मिळणार का?’ अशी विचारणा केली जात आहे.