बारामती, 18 जानेवारी : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना बापाने मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीत बापाने आपल्या 9 वर्षीय मुलाची निघृणपणे हत्या केल्याची घटना 14 जानेवारी रोजी उघडकीस आली. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात बापाने मुलाचे डोकं भिंतीवर आपटून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली असून विजय गणेश भंडलकर असे त्या बापाचे नाव आहे तर पियुष भंडलकर असे मृत मुलाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, पियुषचे वडील विजय भंडलकर यांनी पियुषला, “तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो. तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणार दिसतोय”, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. नंतर त्याने रागाच्या भरात मुलाचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. दरम्यान, यामध्ये मुलगा पियुषचा मृत्यू झाला.
यावेळी पियुषची आजी शालन भंडलकर या त्याठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी त्यांच्या मुलाला अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तसेच मुलगा विजय यांच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडल्याची माहिती दिली आणि यातून त्यांनी हा खून लपवण्याचा प्रयत्न केला.
…अन् पोलिसांनी अत्यंविधी थांबवला –
दरम्यान, संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. यानंतर डॉक्टरांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी मुलाला तेथे नेले नाही. तसेच गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही याबाबत माहिती न देता थेट नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली.
मात्र, पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला. यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात विजय गणेश भंडलकर, मृत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे हे करित आहेत.
हेही वाचा : Video : जळगावात मनसे महानगराध्यक्षाने परप्रांतीय व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल