भुसावळ, 29 जानेवारी : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर शेवटपर्यंत प्रयत्न केले तर तुम्हाला हवं ते यश ते तुम्ही नक्कीच मिळवू शकतात, असा सल्ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदी (जेएमएफसी) निवड झालेल्या अॅडव्होकेट हितेश सोनार यांनी तरुणांना दिला आहे. अॅडव्होकेट हितेश सोनार यांनी नुकतेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. यानंतर सुवर्ण खान्देश लाईव्हने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
असा राहिला हितेश यांचा प्रवास –
हितेश शांताराम सोनार (वय 29 वर्ष) हे भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील शांताराम सोनार हे वायरमन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या आई सरोज या गृहिणी आहेत. त्यांचे वडील शांताराम सोनार यांनी वायरमनची नोकरी करताना आपल्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. अॅडव्होकेट हितेश सोनार यांचे पूर्ण शिक्षण भुसावळ येथेच झाले आहे.
त्यांनी 2013 मध्ये जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर 2017 मध्ये त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ते एलएलबी विषयात त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर त्यांनी पुण्यात येऊन वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.
तरुणांना दिला हा सल्ला –
सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना ते म्हणाले की, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. नेहमी तुम्हाला जे आवडतं आहे तेच काम निवडा. तसेच हे गरजेचं नाही की तुमचं वय किंवा वेळ त्याला बाधा असू शकते. तसेच मला जो आतापर्यंत आलेला अनुभव आहे, त्यातून तरी मला इतकेच जाणवते की, तुम्ही जर सकारात्मकतेने काम केले तर यश तुम्हाला थोडे उशिरा मिळेल पण नक्की यश मिळेल. संयम ठेवला तर तुमच्यापेक्षा तुम्हाला आणखी मोठं यश मिळू शकतं. शेवटी प्रयत्न करणं सोडू नका, असा सल्ला त्यांनी खान्देशातील तरुणांना दिला आहे.
हेही वाचा – नंदुरबारचा 8 वर्षांच्या गणेशच्या जिद्दीची कहाणी, जन्मापासून दोन्ही हात नाही तर आईसुद्धा घर सोडून गेली
अॅडव्होकेट हितेश सोनार यांच्या पत्नी भाग्यश्री सोनार यासुद्धा वकील आहेत. सोनार दाम्पत्य दोघेही बरोबरच प्रॅक्टिस करतात. दरम्यान, त्यांच्या या यशात कुटुंबातील सर्व सदस्य, सहकारी मित्र आणि वरिष्ठांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचा यशात मोठा वाटा आहे’, असेही ते सांगतात. त्यांचा हा प्रवास खान्देशातील तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.