पाचोरा, 22 ऑगस्ट : 2019 साली बहुसंख्य मतदारांनी त्यांना मतदान केले. पण मतदारांनी केलेले मतदान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे ठोक स्वरूपात विकून टाकले. मतं आपली घेतली, आमदार ते झाले अन् तेच विकले गेले. म्हणजे किरकोळमध्ये घ्यायचे आणि ठोकमध्ये विकायचे. लोकं ठोकमध्ये घेतात आणि किरकोळमध्ये विकतात. परंतु यांनी उलटं केलं, अशा शब्दात माजी आमदार दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. पाचोरा येथे आयोजित केलेल्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले दिलीप वाघ? –
मतदारसंघात अनेक सध्या इव्हेंट सुरू आहेत. कुणी रूद्राक्ष वाटतंय, कुणी साड्या वाटतंय तर काहींना राख्या घरी आल्या. मात्र, गेल्या 10 वर्षांत यांना कधी एक बहिण आठवली नाही. कुणी साडी वाटली नाही तर कुणी राखी बांधली नाही. हे सगळे मिळून काही ना काही वाटताय. याचा अर्थ काय तर या सगळ्यांना धसका माझा आहे, असे माजी आमदार दिलीप वाघ यांनी म्हटलंय.
ज्यावेळी मी रिंगणात आलो तेव्हा…. –
माजी आमदार दिलीप वाघ पुढे म्हणाले की, मी जेव्हा अपक्ष किंवा पक्षावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तेव्हा त्यांना असं वाटतं होतं की, वाघ शांत झालेला आहे, आपण सगळं करून घेऊ. मात्र, ज्यावेळी मी रिंगणात आलो तेव्हा सर्वांचे ‘एंडिकेटर’ लागलेले आहेत. तुम्हाला दाव्याने सांगतो. ही जी काही विधानसभेची लढाई होणार आहे. त्यामध्ये मी आत्मविश्वासाने सांगतो की, मी तुमचा उमेदवार आहे. मला उमेदवारी कुठेही मागायला जायची गरज नाही.
तर मी अपक्ष निवडणूक लढणार –
दिलीप वाघ पुढे म्हणाले की, मी मागे पवार साहेबांची भेट घेतली. तसेच अजितदादांची देखील भेट घेतलीय. आमचे त्यांच्यासोबत परिवारिक संबंध आहेत. परंतु, पाचोरा-भडगाव मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की, याठिकाणी आमचं आणि कार्यकर्त्यांचं अतूट नाते आहे. हे तर आता वारस्यासाठी भांडण करताय. आम्ही गेल्या 60 वर्षांपासून या मतदारसंघाचे वारस आहोत. म्हणून जनतेच्या दारी आम्हाला उमदेवारी मागायचीय. जर जनतेने सांगितले अपक्ष निवडणूक लढा तर मी अपक्ष लढेल.
याचं कारण असंय की, 1995 मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस आप्पासाहेब (ओंकार वाघ) विजयी झाले होते. सध्याच्या निवडणूकीत 7-8 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या मतदारसंघात वारस हक्काने मतदार बंधूंची आणि कार्यकर्त्यांची मतदानरूपी संपत्ती आप्पासाहेबांपासून मला मिळाली आहे. आणि ही संपत्ती आम्ही जोपासत असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘तात्या हे निष्ठावंत, मात्र त्याच पाचोऱ्यात आमदारांनी त्या निष्ठेला कलंक लावला’, संजय राऊत यांची जोरदार टीका