ठाणे, 2 डिसेंबर : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दरेगावातून थेट ठाण्यात दाखल झाले. शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने कालपासून त्यांचा मुक्काम ठाण्यातच आहे. दरम्यान, आज गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेत त्यांच्यासोबत एक-सव्वा तास चर्चा केली. यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी ठाण्यात आलो होतो. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली असून महायुतीत सर्व काही आलेबेल असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.
गिरीश महाजन काय म्हणाले? –
ठाण्यात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक संपल्यानंतर मुंबईत आले. यानंतर तब्येत बरी नसल्यामुळे ते आपल्या गावी म्हणजे दरे याठिकाणी गेले. त्यांना थ्रोट इंन्फेक्शन झाले होते. ताप आला होता. यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आज ठाण्यात आलो होतो.
View this post on Instagram
महायुतीत कोणताही मतभेद नाहीत –
अलीकडे अफवा पसरविल्या जात आहेत की, महायुतीत मतभेद-मतांतर आहेत. मात्र, ह्या गोष्टींमध्ये कुठलेही तथ्य नसून महायुतीत कोणताही मतभेद नाहीत. असे असताना राज्याच्या नव्या सरकारच्या 5 तारखेच्या शपथविधीसाठी सगळी तयारीही सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची उद्यापर्यंत तब्येतही बरी होईल. यानंतर ते बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, मंत्रीपदाबाबतच्या खात्याबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाहीये. मंत्रीपदाच्या वाटपाबाबतचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असल्याचेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
आम्ही सगळे एकत्र आहोत –
शपथविधीसाठी तयारी सुरु असताना आम्ही सगळे एकत्र आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातील नेते तसेच देशाभरातील राजकीय पक्षाचे नेते शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन आढावा देखील घेतलाय. आणि मोठ्या थाटामाटात आमच्या महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा : maharashtra politics : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? हे दोन नेते ठरवणार, नावं जाहीर