पुणे, 9 जुलै : आयुष्याच्या या प्रवासात काही जणांना पाठबळ मिळतं. तर दुर्देवाने बापाचं निधन झालेलं असेल तर पुढचा प्रवास हा अनेकांसाठी कठीण असतो. पण तरीसुद्धा काही जण असतात, आयुष्याच्या प्रवासात लढतात आणि स्वत:ला सिद्ध करतात. आणि यातलंच एक नाव म्हणजे स्नेहल तनपुरे. पुणे जिल्ह्यातील स्नेहल तनपुरे या तरुणीला जगातील 8 प्रसिद्ध विद्यापीठांकडून तिथं प्रवेश घेण्यासाठी ऑफर लेटर आलं आहे. पण तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला हे शक्य नसल्याने तिने मदतीचं आवाहन केलं आहे.
स्नेहलला भविष्यात डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करायचे आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी तिला काम करायचे आहे. या वर्गातील तरुणांसाठी शैक्षणिक जागरुकता तसेच त्यांना रोजगाराच्या कोणत्या संधी मिळवून देता येतील तसेच आयुष्यातील संवैधानिक मूल्य जपली जावीत, यासाठी तिला काम करायचे आहे. दरम्यान, यानिमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने तिच्याशी संवाद साधला. जाणून घेऊयात, तिचा संघर्षमय प्रवास.
बालपणीच वडिलांचं निधन –
स्नेहल ही मूळची पुण्याची. ती दुसरीला असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर घरात चार भावडं आणि आई असा परिवार आहे. यामध्ये तिचा एक मोठा भाऊ दिव्यांग आहे. एक लहान भाऊ पार्ट टाईम नोकरी करुन शिक्षण घेत आहे. वडील गेल्यानंतर आईने शिवणकाम करुन या सर्व भावंडांचं पालनपोषण केलं. यासोबत आईच्या बहिणीचंही या सर्वांना सहकार्य लाभलं, असं ती सांगते.
पार्ट टाईम नोकरी करत घेतलं पदवीचं शिक्षण –
दहावीनंतर मोठ्या बहिणीने पार्ट टाईम नोकरी करुन शिक्षण सुरू ठेवलं. तिच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्नेहलनेही दहावीनंतर पार्ट टाईम नोकरी करत शिक्षण सुरु ठेवलं. दहावीनंतर तिला फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश मिळाला आणि याठिकाणी तिने समाजशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. यादरम्यान तिने दहावीपासून ते पदवीच्या पूर्ण पदवीच्या शिक्षणापर्यंत पार्ट टाईम नोकरी करत आपले घर सांभाळले.
पदवीच्या शिक्षणानंतर फर्ग्युसन कॉलेजची काही विद्यार्थी अझीम प्रेमजी विद्यापीठात शिक्षण घेत होते. याबाबतची तिला माहिती मिळाली. मग तिने पुढील शिक्षणासाठी याबाबत माहिती काढली. यानंतर तिला अझीम प्रेमजी विद्यापीठाची 100 टक्के स्कॉलरशिप मिळाली आणि तिने एमए इन एज्युकेशन या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि बंगळुरू येथून तिने हे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण घेत असतानाच झाली जाणीव –
हे शिक्षण घेत असताना तिला भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रात, आदिवासी भागात शिक्षण क्षेत्र वगैरे काम करणं किती गरजेचं आहे, शिक्षण आपलं एकमात्र प्रगतीचं साधन आहे, असा विचार मांडला जात असताना ग्रामीण भागात याबाबत काम करणं किती महत्त्वाचं आहे, हे जाणवलं. तर एमएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मागील अडीच वर्षांपासून ती मध्यप्रदेशातील येथे अझीम प्रेमजी फाऊंडेशनसोबत ती या क्षेत्रात काम करत आहे.
यादरम्यान, काम करताना काय अनुभव आला याबाबत ती सांगते की, समाजात काम करत असताना शिक्षणासोबतच समाजामध्ये इतरही अनेक गोष्टींची गरज आहे. गरीबी आहे, रोजगाराची समस्या आहे. शिक्षण हा मुद्दा त्यांच्यासाठी प्राथमिकता नाही. समाजात काम करत असताना या गोष्टी जाणवायला लागल्यानंतर या विषयासंदर्भात आणखी खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, असं वाटलं आणि यामुळेच आणखी उच्च शिक्षण घ्यावं असं वाटलं. त्यामुळे मग इंग्लंड आणि भारतातील काही ओळखीच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रमाबाबत माहिती मिळाली. यानंतर तिने जगप्रतिष्ठित चेवेनिंग स्कॉलरशिपला अप्लाय केलं. सध्या ती या चेवेनिंगच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे.
परदेशातील उच्च शिक्षणासाठी तिने अप्लाय केल्यानंतर तिला University of Glasgow, University of Bristol, University of East Anglia, University of Leeds यासोबतच इतर आणखी 4 जगप्रतिष्ठित विद्यापीठांकडून तिला ऑफर लेटर्स मिळाले आहेत. पण University of Leeds मध्ये MA in Gobal Education and Development या कोर्ससाठी प्रवेश घ्यायची तिची इच्छा आहे. त्याचे कारण असे की, तिला ज्या विषयात काम करायचे आहे, त्यासाठी तिला हा कोर्स महत्त्वाचा आहे.
जर तिला चेवनिंग स्कॉलरशिप नाही मिळाली तर तिला स्वत:च्या पैशाने तिला प्रवेश घ्यावा लागणार आहे. पण तिची आर्थिक परिस्थिती पाहता तिला हे शक्य होणार नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी तिच्याजवळ फार कमी वेळ उरला आहे. त्यामुळे तिने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
भविष्यात कुठल्या क्षेत्रात काम करण्याचा मानस –
स्नेहलला भविष्यात डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करायचे आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी तिला काम करायचे आहे. या वर्गातील तरुणांसाठी शैक्षणिक जागरुकता तसेच त्यांना रोजगाराच्या कोणत्या संधी, तसेच आयुष्यातील संवैधानिक मूल्य जपली जावीत, यासाठी तिला काम करायचे आहे, असे तिने यावेळी बोलताना सांगितले.
भविष्यात जे तिला काम करायचं आहे, हे स्वप्न तिचं एकटीचं नसून समाजाप्रती आलं कर्तव्य आहे. भविष्यात समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण आणि उपजीविकेची साधने पोहोचवणे हा आपला उद्देश्य आहे. तसेच त्यासाठी तिला मदत करावी, असं आवाहन तिने केलं आहे.
मदत पाठवण्यासाठी बँक डिटेल्स
- खातेदाराचे नाव – Snehal Kunal Tanpure
- खाते क्रमांक – 50100372012695
- बँकेचे नाव – HDFC Bank, Warje, Pune
- IFSC कोड -HDFC002808
- फोन पे/गुगल पे क्रमांक – 8815831165
प्रवासात या लोकांचं महत्त्वाचं योगदान –
स्नेहलने डॉ. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांच्यासोबतही स्वयंसेवक म्हणून काम केलंय. त्यांच्यामुळेही तिला सामाजिक क्षेत्रात काम केल्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यासोबत मेळघाटात दोन वर्षे युथ कॅम्प घेतले. दरवर्षी दोन वर्षी कॅम्प आयोजित केले जायचे. यामाध्यमातूनही बरचसं काही शिकायला मिळालं. तसेच बीडमधील गेवराई येथील अनाथालय संस्थेचे संतोष गर्जे यांच्याकडून तिला बरंच काही शिकायला मिळालं. तसेच एकलव्य या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेचे राजू केंद्रे (चेवेनिंग स्कॉलर), भारती चौधरी, दिक्षा दिंडे यांचेही तिला या प्रवासात मोठे मार्गदर्शन मिळाले, असे ती सांगते. एकलव्यच्या ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामच्या माध्यमातून तिला या सर्व प्रक्रियेत वेळोवेळी एकलव्यच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.