चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – डिसेंबर महिना संपत आला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लवकरात लवकर 2100 रुपये द्यावे, अशी मागणी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आज केली. त्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलत होत्या.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. 16 डिसेंबरला या अधिवेशनाची सुरुवात झाली असून 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये लवकरात लवकर देण्याची मागणी आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे.
काय म्हणाल्या आमदार सुलभा खोडके –
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुलभा खोडके म्हणाल्या की, येत्या 27 डिसेंबरला आपण भारताचे माजी कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरा करत आहोत. त्यामुळे पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, शासनाचं मी अभिनंदन करते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण लागू केली. त्यांना आपण 1500 वरुन 2100 रुपये देणार आहेत. आता डिसेंबर महिना संपत आला आहे. तरी आपण लवकरात लवकर 2100 रुपये द्यावेत. त्यासोबतच एका व्यक्तीला एकच योजना दिली जात असल्याने संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये द्यावेत, अशी विनंती करत आमदार सुलभा खोडके यांनी या मागण्या यावेळी सभागृहात केल्या.