चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 12 जुलै : विकासात्मक दृष्ट्या या शहराला आपण एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने आमच्या शहरातील किंवा आमच्या तालुक्यातील महिला बचत गटांचा दर्जा हा उत्पादनात्मक आणि वितरणाच्या दृष्टीने आपल्याला कसा उंचावता येईल, असे आवाहन करत हा प्रयत्न आपण सर्वांनी केला तर सर्व महिला बचत गटांना, या शहराला, या तालुक्याला सुगीचे दिवस येतील, अशा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा शहरात आज महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी बहिणाबाई मार्ट या वास्तूचा भूमिपूजन सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी 1 कोटी 49 लाख रुपये खर्चून तयार होणाऱ्या खान्देशातल्या बहिणाबाई मार्ट या वास्तूचा भूमिपूजन सोहळ्याबाबत माहिती दिली.
यांची होती उपस्थिती –
यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील, पाचोरा शहरचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शरद पाटे, शिवशक्ती भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे, युवानेते सुमित पाटील, नगरपालिकेचे अभियंता भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेच्या मंदाकिनीताई पारोचे तसेच बचत गटाच्या महिला, शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.एन. चौधरी यांनी तर आभार शरद पाटे यांनी मानले.
नेमकं काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
जळगाव जिल्ह्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने 6 मार्ट मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 15 तालुके असतानाही आपल्या पाचोरा तालुक्यासाठी बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने 3 कोटी रुपयांचे 2 मार्ट दिले. याबाबत आपमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, ही कल्पना आपल्या जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असताना आपण पहिल्यांदा हा विषय मांडला. संपूर्ण राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यातील महिला भगिनी स्व:कर्तृत्वावर चांगले कार्य करत आहेत. चांगले उत्पादन ते करत आहेत. बँकेतून घेतलेले कर्ज पूर्णपणे महिला बचत गटाच्या महिला परतफेड करत आहेत. वेळेवर सर्व प्रकारचे हप्ते भरून आपला सीबील खराब न करता बँकांमध्ये आज महिला बचत गटाच्या महिलांनी आपली चांगली पत तयार केली आहे. म्हणून हा विषय उठवल्यावर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी आपल्या जिल्ह्याच्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने हे मार्ट मंजूर केले आणि 3 कोटी रुपयांचा निधी पाचोरा आणि नगरदेवळासाठी आपण मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या बँकांमधून आपण कर्ज घेत आहात, परतफेडही चांगल्या पद्धतीने करत आहात, आपण ज्या वस्तूंची निर्मिती करत आहेत, त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कुठेतरी आपल्याजवळ चांगल्या पद्धतीची वास्तू असावी, ही अनेक दिवसांची मागणी होती आणि येणाऱ्या 6 महिन्यांच्या आत 100 टक्के ही मागणी पूर्ण होणार आहे, अशा पद्धतीची व्यवस्था आज याठिकाणी निर्माण झाल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
हा जळगाव जिल्ह्यातला प्रयोग कदाचित महाराष्ट्रातला पहिला प्रयोग असावा. त्यामुळे आपल्या तालुक्याला जर ही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे, तर ज्या वस्तू आपण तयार करणार आहात, या सर्व वस्तू थेटपर्यंत कशा पोहोचवता येतील, यासाठी काम करुयात, असेही ते म्हणाले.
जागा इतकी सुंदर निवडली आहे की, पाचोरा शहरात बाजारासाठी येणारा नागरिक या परिसरात आल्याशिवाय त्याचा बाजार पूर्ण होणार नाही, अशी भावना त्याच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, अशी सुंदर जागा याठिकाणी आपण निवडली आहे. 6 महिने आपल्या हातात आहे. 6 महिने मी नेमकी काय वस्तू तयार केली, त्या वस्तूला बाजारात चांगल्या पद्धतीने चालना मिळेल, अशा चांगल्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे.
या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज आहे. आपल्या या तालुक्यात बचत गटांनी काही कर्ज घेतलेले आहे. या शहरातील जेवढे महिला बचत गट असतील, त्याचे कर्ज 10 कोटी रुपयांपर्यंत कसं नेता येईल, या भांडवलातून आपल्याला कसा करता येईल, आणि जे मार्केट आपण उपलब्ध करुन देत आहोत, त्यातून आपल्याला पुढे कसं जाता येईल, हा प्रयत्न केला तर आपल्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल.
महाराष्ट्रात किंवा भारतात अशी काही गावं असतील, त्याठिकाणी बचत गटांचं खूप मोठं नाव असेल, त्याचं जे मार्केटिंग करण्याची पद्धत आहे, त्यांचं जे प्रॉडक्शन करण्याची पद्धत आहे, त्यासाठी आपल्या काही सहली काढता येतील का, यामध्ये प्रत्येक महिला बचत गटातील एक महिला घेतली किंवा टप्प्याटप्प्याने बचत गटाच्या महिलांच्या जर आपण काही सहली काढल्या आणि तेथील गोष्टी समजून घेतल्या, त्या दिशेने जर आपण वाटचाल केली तर आपल्याला या माध्यमातून नक्कीच चालना मिळेल.
आज अनेकांना बँक कर्ज देत नाही. पण महिला बचत गटांनी इतकी पत निर्माण केली आहे की, बँका आता महिला बचत गटांना घरबसल्या कर्ज द्यायला लागल्या आहेत. म्हणून आपल्याला याचा फायदा घेऊन चांगला व्यवसाय कसा करता येईल आणि त्या व्यवसायातून आपल्याला चांगल्यात चांगले उत्पन्न कसे मिळवता येईल, विकासात्मक दृष्ट्या या शहराला आपण एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने आमच्या शहरातील किंवा आमच्या तालुक्यातील महिला बचत गटांचा दर्जा हा उत्पादनात्मक आणि वितरणाच्या दृष्टीने आपल्याला कसा उंचावता येईल, हा प्रयत्न आपण सर्वांनी केला तर सर्व महिला बचत गटांना, या शहराला, या तालुक्याला सुगीचे दिवस येतील, अशा विश्वासही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.