जळगाव, 14 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील गणेशोत्सव उत्साहात, परंपरेत आणि सामाजिक भान राखून साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. सर्वांनी तो आनंद, एकोपा आणि सुरक्षिततेत साजरा करावा. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यांची गुणवत्ता कायम चांगली राखावी, गणेश मंडळांनी आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारी आरास उभारावी, तसेच वर्गणीतून काही निधी दुर्लक्षित व वंचितांच्या कल्याणासाठी वापरावा. यामुळे जळगाव जिल्ह्याची प्रतिमा आणखी उंचावेल.”
यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उत्सव काळात अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. “वीजपुरवठा अखंडित राहावा, आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद मिळावा, आणि सर्वांना आनंदाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,” असे त्यांनी नमूद केले.
या वर्षी जिल्ह्यात एकूण २,९४६ गणेश मंडळांची नोंद झाली असून, अनेक मंडळांनी मिरवणुका व मूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, मिरवणुकीदरम्यान व विसर्जनावेळी डीजे आणि ध्वनीवर्धक यंत्रांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा अधिक नसावा. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, मिरवणुकीच्या वेळांचे नियोजन आणि पोलीस बंदोबस्त याबाबत सविस्तर योजना आखण्यात आली आहे.
बैठकीला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन नराळे यांसह विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढावा बैठकीत पोलीस विभागाकडून सुरक्षा बंदोबस्त, अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन प्रतिसाद, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा, वीज विभागाकडून अखंडित वीजपुरवठा, तर महापालिका व ग्रामपंचायतींकडून स्वच्छता आणि घाटांची सुविधा याबाबत तयारी सादर करण्यात आली.
बैठकीदरम्यान गणेश भक्तांनी प्रतिनिधीक स्वरूपात काही स्थानिक समस्या मांडल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. उत्सव हा फक्त आनंदाचा नाही, तर समाजातील ऐक्य आणि बंधुत्व वृद्धिंगत करण्याची संधी आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.